UP Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील लढत अतिशय रंजक बनत चालली आहे. याचे कारण म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एका 'मृत' व्यक्तीने शड्डू ठोकलाय. लाल बिहारी 'मृतक' असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांना सरकारी कागदावर मृत घोषित करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी वाराणसीतून पंतप्रधान मोदींना आव्हान देण्याचे ठरवले आहे.
लाल बिहारी 'मृतक' सामाजिक कार्यकर्ते आणि मृतक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. या निवडणुकीबाबत लाल बिहारी सांगतात की, पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवून, ते व्यवस्थेविरुद्ध आपली लढाई अधोरेखित करू इच्छइत आहेत. विशेष म्हणजे, व्यवसायाने शेतकरी असलेल्या लालबिहारी यांना 1972 मध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी कागदावर मृत घोषित केले होते. त्यांच्या नातेवाईकांनी मालमत्तेच्या लालसेपोटी तहसील सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने लालबिहारी यांना कागदावर मृत घोषित करून त्यांची जमीन बळकावली होती.
त्यांनी तहसील आणि जिल्हा प्रशासनासह राज्य आणि केंद्र सरकारकडे मदतीची याचना केली, पण त्यांचे कुणीच ऐकले नाही. 19 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर 1994 मध्ये त्यांना न्याय मिळाला. न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक तहसीलने कागदपत्रांमध्ये दुरुस्त्या करून लाल बिहारींना जिवंत मानले. यानंतर त्यांनी, त्यांच्याप्रमाणे सरकारी कागदांवर मृत घोषित झालेल्या लोकांना एकत्र करुन मृतक संघटना स्थापन केली आणि स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष बनले. यानंतर कागदावर मृत झालेल्या व्यक्तींचा लढा संघटनात्मक पातळीवर लढला जाऊ लागला.
विशेष म्हणजे, मृत घोषित केलेल्या लोकांच्या मूलभूत अधिकारांना मान्यता देण्यासाठी लाल बिहारी यांनी तीन वेळा लोकसभा आणि तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. लालबिहारी यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या राजीनाम्यानंतर 1988 मध्ये अलाहाबाद मतदारसंघातून व्हीपी सिंह यांच्याविरोधात लोकसभा निवडणूकही लढवली होती. 1989 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राजीव गांधी यांच्या विरोधातही अमेठीतून निवडणूक लढवली. याशिवाय, 2004 मध्ये आझमगडमधील लालगंज राखीव लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली. आता ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
लाल बिहारी मृतक यांच्या आयुष्यावर दिवंगत दिग्दर्शक सतिश कौशिक यांनी 'कागज' नावाचा बॉलीवूड चित्रपटही बनवला. या चित्रपटात अभिनेता पंकज त्रिपाठीने लाल बिहारी यांची भूमिका साकीरली होती.