नवी दिल्ली - एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाने दरवाजा उघडताच त्याला करंट लागला. जवळ असलेल्या काही लोकांनी कपडे आणि लाकूड याच्या मदतीने तरुणाला एटीएमच्या दरवाजापासून दूर केलं. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिसा़डी रोडवर इंडिया वन बँकेचं एक एटीएम आहे. कोतवाली भागात राहणारा दानिश एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी दरवाजा उघडताच त्याला शॉक लागला. ही घटना घडताच लोकांची गर्दी झाली. लोकांनी त्याला कसंबसं दरवाज्यापासून लांब केलं. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे त्याचा मृत्यू झाला. दानिशच्या मृत्यूनंतर परिसरातील लोकांनी एटीएमबाहेर मोठा गोंधळ घातला.
एटीएमला विजेचा सप्लाय करण्यासाठी जी तार लावण्यात आली होती. ती दरवाजावरून जात होती. मात्र मध्येच ती कट झाली असल्याने त्यातून करंट येत होता. यामुळेच दानिशला देखील शॉक लागला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील लोकांना समजावलं, शांत केलं आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी याप्रकरणी एटीएम असणाऱ्या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली असून अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.