वाराणसी- उत्तर प्रदेशातील विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजपा) अधिकांश जागा जागा जिंकल्या आहेत. पण, भाजपचा गड म्हणवल्या जाणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत मात्र, भाजपला मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत वाराणसीमध्ये भाजपचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. या जागेवर ब्रिजेश सिंह यांची पत्नी अन्नपूर्णा सिंह यांनी निर्णायक आघाडी मिळवली आहे.
अन्नपूर्णा सिंह यांना 2058 मते मिळाली आहेत. सपा उमेदवार उमेश यादव 171 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. भाजप उमेदवार डॉ. सुदामा पटेल 103 मतांसह तीसऱ्या क्रमांकावर आहेत. तर 68 मते रद्द झाली आहेत.
सुदामा पटेलांना आधीच होती पराभवाची भीती -वाराणसीतील भाजपचे उमेदवार सुदामा पटेल यांना आधीच पराभवाची भीती होती. एवढेच नाही, तर त्यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांसोबत बोलताना, पक्षाचे नेते आपल्याला पाठिंबा देत नसून, माफिया ब्रिजेश सिंह याच्या पत्नीला पाठिंबा देत असल्याचे म्हटले होते. खरे तर वाराणसीती या विधानपरिषदेच्या जागेवर ब्रिजेश सिंह यांचे आधीपासूनच वर्चस्व आहे. गेल्या तब्बल दोन दशकांपासून ही जागा ब्रिजेश सिंह यांच्याच कुटुंबाचा ताब्यात आहे. मात्र, असे असले तरी, सपाच्याही मागे पडणे, हा भाजपसाठी निश्चितच धक्का मानला जात आहे.