UP News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. राजधानी लखनऊमध्ये 17 वर्षांपूर्वी सिझेरियन ऑपरेशनदरम्यान महिलेच्या पोटात कात्री विसरल्याची घटना घडली होती. आता इतक्या वर्षांनंतर महिलेचा एक्स-रे करण्यात आला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी महिलेच्या पतीने गाझीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार अरविंद पांडे यांनी सांगितले की, 26 फेब्रुवारी 2008 रोजी त्यांच्या पत्नीला प्रसूती वेदनेमुळे इंदिरानगर येथील नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. तिथे सिझेरियन ऑपरेशनद्वारे पत्नीची प्रसूती झाली. मात्र, ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिच्या पोटात कात्री गेली. यानंतर महिला वारंवार पोटदुखीची तक्रार करत होती. अनेक डॉक्टरांकडे उपचार करुनही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
अलीकडेच महिलेच्या पोटाचा एक्स-काढण्यात आला, यादरम्यान पोटात चक्क कात्री आढळली. यानंतर तिला किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) मध्ये दाखल करण्यात आले. 26 मार्च रोजी एका जटिल शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी कात्री काढली. यानंतर अरविंद पांडे यांनी नर्सिंग होमच्या डॉक्टराविरुद्ध गाझीपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या निष्काळजीपणामुळे पत्नीला 17 वर्षे शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप त्यांनी केला.
ही घटना वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण आहे. गाझीपूर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे आरोग्य सेवेचा दर्जा आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पोलिस तपासात काय समोर येते आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.