गाझीपूर : उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) आमदार बेदी राम रस्त्याच्या बांधकामातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करताना दिसत आहेत. गाझीपूर ते जखनिया भागात बांधण्यात येत असलेल्या नवीन रस्त्याचा दर्जा एवढा खराब आहे की, आमदार बेदी राम यांनी रस्त्यावर पाय घासताच डांबराचा रस्ता उखडाला.
सुभासपाचे आमदार बेदी राम यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) गाझीपूर-जखनिया विधानसभा मतदारसंघात बांधत असलेल्या रस्त्यात भ्रष्टाचार करत असल्याची माहिती मिळाली होती. ग्रामस्थांकडून मिळाल्यानंतर आमदार बेदीराम यांनी 29 मार्च रोजी अचानक घटनास्थळी पोहोचून रस्त्याची पाहणी केली. पाहणी करताना बेदी राम यांनी आपल्या पायाने रस्ता घासताच डांबर निघून गेले. हे निकृष्ट दर्जाचे काम पाहून आमदार अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले.
यावेळी आमदार बेदी राम यांनी कंत्राटदारालाही चांगलेच फैलावर घेतले. असा रस्ता बांधतात का? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. 37 सेकंदाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये आमदार बेदी राम प्रचंड संतप्त दिसत आहेत. यावेळी त्यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट रस्त्याचे काम झाल्याचे म्हटले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर गाझीपूरचे जिल्हाधिकारी आर्यका अखोरी यांनी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. डीएमने हेमा कन्स्ट्रक्शनविरोधातही गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.