उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) योगी सरकार (Yogi Adityanath Government) परतल्यानंतर बुलडोजरचा जलवा पुन्हा वाढताना दिसत आहे. निवडणुकीनंतर बेकायदा मालमत्तांवर बुलडोझर चालत असल्यानं लोक एकमेकांना 'बुलडोजर' भेट म्हणून देत आहेत. लग्नात वधू-वरांना दिल्या जाणार्या सर्व भेटवस्तू तुम्ही पाहिल्या असतीलच, पण आता उत्तर प्रदेशमध्ये नवविवाहित जोडप्यांना 'बाबा का बुलडोजर' भेट म्हणून दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रयागराजमध्ये सोमवारी चौरसिया समाजामार्फत नऊ जोडप्यांचा सामूहिक विवाह करण्यात आला. या नवविवाहित जोडप्यांना भेट म्हणून प्लॅस्टीकचा खेळातील बुलडोजर देण्यात आला. 'बाबा का बुलडोजर' मिळाल्यानंतर नव्या जोडप्यांनीही चुकीचं काम सहन केलं जाणार नाही असं म्हटलं. उत्तर प्रदेशात गुन्हेगार आणि माफियांवर योगी सरकारनं कारवाईचा बडगा उचलला होता. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बुलडोजर बाबांचा जलवा दिसून आला होता. आता लग्नसोहळ्यातही नवविवाहितांना बुलडोजर भेट म्हणून देण्यात येत आहेत.
माफियांवरील कारवाईनंतर 'बाबा का बुलडोजर' हे एकप्रकारचं प्रतीकच बनलं आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात मुन्हा कॅबिनेट मंत्री झालेले नन्द गोपाल गुप्ता यांची पत्नी महापौर अभिलाषा गुप्ता नंदी आणि किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर यांच्यासह चौरसिया समाजाचे काही पदाधिकारीही उपस्थित होते.