उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे गुरवारी दुपारी एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे चंडीगड येथून आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त डब्यांमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. मात्र या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चंडीगड येथून दिब्रुगडला जाणारी ट्रेन क्रमांक १५९०४ दिब्रुगड एक्स्प्रेस ही आज दुपारी २ च्या सुमारास गोंडा जंक्शन येथून पुढच्या प्रवासाला निघाली होती. मात्र काही वेळातच दुपारी २.३० च्या सुमारास गोंडापासून २० किमी अंतरावर या ट्रेनला अपघात झाला. या अपघातात ट्रेनचे दोन डबे रुळावरून पूर्णपणे घसरले. तर इतर काही डबेही अपघातग्रस्त झाले. अपघातग्रस्त डब्यांमधून प्रवाशी जीव मुठीत धरून बाहेर पडले.
दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पोलीस प्रशासनानेही अपघातस्थळी धाव घेतली आहे. वैद्यकीय पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. तसेच डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनीही या अपघाताची दखल घेतली असून, अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.