उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शनिवारी रात्री एका चालत्या बसमध्ये लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झालेली पाहायला मिळाली. बसमधील तिकिटाचे पैसे मागितल्याने प्रवासी आणि कंडक्टरमध्ये सुरू झालेल्या वादाचं रुपांतर काही वेळातच हाणामारीत झालं. यावेळी इतर प्रवाशांना मध्ये पडावं लागलं. परिस्थिती इतकी बिकट झाली की बस रस्त्याच्या मधोमध थांबवली गेली.
मिळालेल्या माहितीनुसार, UP78FN1732 ही बस लखनौहून कानपूर उन्नाव डेपोकडे जात होती. रात्री उशीरा बस कृष्णानगर येथे पोहोचली असता एक प्रवासी येऊन बसमध्ये बसला. कंडक्टरने प्रवाशाकडे तिकिटाचे पैसे विचारले असता त्याने पास असल्याचं सांगितलं. त्यानंतर कंडक्टरने पास पाहिला असता तो २०२२ चा असल्याचं आढळून आले. याच दरम्यान प्रवाशाने स्वत:ला बस कर्मचारी म्हणवून घेण्यास सुरुवात केली.
हे प्रकरण चिघळल्याने दोघांमध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली. यानंतर कंडक्टरने प्रवाशाला बेदम मारहाण करून बसमधून खाली उतरवले. हाणामारी आणि गोंधळामुळे बस अर्धा तास थांबवावी लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये कंडक्टर सीटवर चढून प्रवाशाला मारहाण करताना दिसत आहे.
बसचे व्हिडीओ दररोज व्हायरल होत आहेत. याआधी एका महिलेची चालत्या बसमध्ये प्रसूती झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. गेल्या ऑगस्टमध्ये अलिगडमध्ये चालत्या बसमध्ये एका महिलेला प्रसूती वेदना होत असताना बसमध्ये उपस्थित असलेल्या महिला प्रवाशांनी बस थांबवली आणि तिची प्रसूती झाली. यानंतर महिलेने मुलाला जन्म दिला.