यूपीएचे ३२ आमदार अन् ३५ नेते हवाईमार्गे थेट रायपूरकडे रवाना; झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:02 AM2022-08-31T11:02:21+5:302022-08-31T11:02:37+5:30

रायपूरमध्ये जाणाऱ्यांमध्ये यूपीएच्या अनेक आमदारांचा समावेश आहे.

UPA 32 MLAs and 35 leaders left for Raipur by air; Political movement in Jharkhand gathers pace | यूपीएचे ३२ आमदार अन् ३५ नेते हवाईमार्गे थेट रायपूरकडे रवाना; झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग

यूपीएचे ३२ आमदार अन् ३५ नेते हवाईमार्गे थेट रायपूरकडे रवाना; झारखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग

googlenewsNext

नवी दिल्ली- झारखंडमध्ये लाभाचे पद प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याच्या शक्यतेने महाआघाडीच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची भीती सतावते आहे. महाराष्ट्रात अलीकडेच शिवसेनेत झालेल्या फुटीपासून धडा घेऊन महाआघाडीच्या आमदारांना काँग्रेसशासित छत्तीसगढमध्ये नेण्यात आले आहे. रायपूरमध्ये जाणाऱ्यांमध्ये यूपीएच्या अनेक आमदारांचा समावेश आहे. तथापि, या आमदारांबरोबर मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच झामुमोचे काही आमदार गेलेले नाहीत.

यूपीएच्या ३२ आमदारांसह ३५ नेते रांची विमानतळावरून विशेष विमानाने रायपूरकडे रवाना झाले. यात सत्ताधारी झामुमोचे १९, कॉंग्रेसचे १२ व राजदच्या एका आमदाराचा समावेश आहे. याबरोबरच काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे, प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर व संतोष पांडेय यांचाही त्यात समावेश आहे. महाआघाडीत कोणत्याही प्रकारची फूट पडू नये, यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. 

रायपूरमध्ये मेफेअर गोल्ड रिसॉर्टमध्ये आमदारांसाठी दोन दिवसांचे बुकिंग करण्यात आले आहे. हॉटेलला हाय सिक्युरिटी झोन जाहीर करण्यात आले आहे. तेथे एक डीएसपी व दोन पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तथापि, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना सध्या रांचीमध्येच राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्याबाबत गुरुवारच्या कॅबिनेट बैठकीनंतर निर्णय घेतला जाणार आहे.

झारखंडचा 'महाराष्ट्र' होणार नाही: अविनाश पांडे

आमदारांना आमिष दाखवून महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यात भाजपला यश आले. त्याप्रमाणे 'ऑपरेशन लोटस' झारखंडमध्ये यशस्वी होणार नाही, असा दावा काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी व माजी खासदार अविनाश पांडे यांनी केला आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विधानसभा सदस्यत्वाबद्दल वाद उत्पन्न झाला आहे. यासंदर्भात झारखंडच्या राज्यपालांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही. परंतु झारखंडमध्ये 'ऑपरेशन लोटस करण्याचा निश्चय भाजपने केल्याचा दावा अविनाश पांडे यांनी केला आहे. यूपीएचे सारे आमदार एकजूट असल्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: UPA 32 MLAs and 35 leaders left for Raipur by air; Political movement in Jharkhand gathers pace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.