नवी दिल्ली: यूपीए सरकारच्या काळात अनेक सर्जिकल स्ट्राइक झाले. पण आम्ही कधीही त्यांचा मतांसाठी वापर केला नाही, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रचारसभांमध्ये एअर स्ट्राइक आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत असताना सिंग यांनी हे विधान केलं. राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद्यांविरोधातील कारवाई, आर्थिक आघाडीवरील देशाची स्थिती या मुद्द्यांवर सिंग यांनी 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. 2008 मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर आम्ही कूटनीतीच्या माध्यमातून पाकिस्तानला उघडं पाडण्याचा मार्ग स्वीकारला. पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले. लष्करी सामर्थ्याचा वापर न करता कूटनीतीच्या मार्गानं जाण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं. 26/11 च्या हल्ल्यानंतर 14 दिवसांत आम्ही हाफिझ सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात यशस्वी झालो. त्यासाठी आम्ही चीनशी संवाद साधला होता. मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या सईदवर अमेरिकेनं 10 मिलियन डॉलरचं बक्षीस जाहीर केलं. त्यासाठी यूपीए सरकारनंच प्रयत्न केले होते, असं सिंग म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी सध्या झंझावाती दौरे करत आहेत. प्रत्येक जनसभेत मोदी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. यावरही सिंग यांनी भाष्य केलं. राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राच्या माध्यमातून मोदींनीच सागरी सीमा सुरक्षा यंत्रणेला विरोध केला होता. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, असं सिंग यांनी सांगितलं. सिंग यांनी 1971 आणि 1965 मध्ये झालेल्या युद्धांचा संदर्भ देत मोदींवर निशाणा साधला. इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र त्यांनी कधीही लष्कराचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही, अशा शब्दांमध्ये सिंग यांनी मोदींवर शरसंधान साधलं.
इंदिरा गांधी आणि शास्त्रींची सध्याच्या पंतप्रधानांशी तुलनाच होऊ शकत नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. मोदी आर्थिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. जवानांच्या कामगिरीमागे आपलं आर्थिक अपयश लपवण्याचा प्रयत्न मोदींकडून सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचं सरकार आल्यास पुन्हा पंतप्रधान व्हायला आवडेल का, या प्रश्नालादेखील त्यांनी उत्तर दिलं. आता नेतृत्व तरुणांकडे सोपवण्याची वेळ आल्याचं सिंग म्हणाले.