नवी दिल्ली : आधारबाबत काँग्रेसप्रणीत यूपीए साशंक होती. त्यामुळे या आघाडी सरकारने आधारची योजना मनापासून लागू केली नाही, अशी टीका केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. हीच आधारची योजना नंतर कलाटणी देणारी ठरली, असेही त्यांनी म्हटले आहे.
फेसबुकवरील आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आधार योजना अमलात आणण्याचे श्रेय घेण्याऐवजी काँग्रेसने तिच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे हा पक्ष आधारविरोधी आहे अशी प्रतिमा निर्माण झाली. आधारबाबत कालांतराने नरेंद्र मोदी यांनीच ठाम निर्णय घेतले. अरुण जेटली म्हणाले की, यूपीएच्या काळात संसदेत संमत झालेले आधार विधेयक हे अपुरे होते. व्यक्तीचे खासगीपण जपण्यासंदर्भात त्यात योग्य त्या तरतुदी केलेल्या नव्हत्या. आधार योजनेचा फेरआढावा घेऊन त्याबद्दलच्या विधेयकाचे संपूर्ण स्वरूपच मोदी सरकारने बदलले. देशाच्या विकासासाठी आधार योजनेचा योग्य उपयोग आम्ही करून घेतला.सरकारचे ९० हजार कोटी वाचविलेजेटली यांनी म्हटले आहे की, सरकारकडून जनतेला विविध योजनांद्वारे आर्थिक साहाय्य, तसेच सबसिडी दिली जाते. त्यातील काही लाभार्थी हयात नसतात. बनावट लाभार्थी अशा योजनांचा लाभ उठवितात. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी आधारच्या नव्या कायद्यात योग्य तरतुदी करण्यात आल्या. देशातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या बहुतांश नागरिकांना आता आधार कार्ड मिळाले आहे. त्यामुळे सरकारी मदत योग्य त्या व्यक्तीसच मिळू लागली. या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारचे गेल्या काही वर्षांत ९० हजार कोटी रुपये वाचले आहेत.