नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रीय पातळीवर भाजपाला टक्कर देण्यासाठी आघाडी स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग आल्याचे दिसत होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये पुढाकार घेतला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपाविरोधी पक्षांच्या नेत्यांना स्नेहभोजनासाठी आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. त्यानंतर सोनिया गांधी संयुक्त पुरोगामी आघाडीप्रमाणे (यूपीए) विरोधी पक्षांची मोट बांधण्यात पुन्हा एकदा यशस्वी होतील, अशी चर्चाही सुरु झाली होती. परंतु, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नव्या भूमिकेमुळे नव्या आघाडीचा हा पर्याय संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 'पिपल्स डेमोक्रसी' या आपल्या मुखपत्रातील ताज्या अंकात यूपीए-3 चा प्रयोग यशस्वी होणार नाही, असे म्हटले आहे. अनेक लहान प्रादेशिक पक्ष भाजपाविरोधी आघाडीचे नेतृत्त्व काँग्रेसकडे देण्याविषयी प्रतिकूल आहेत. काँग्रेसने ती विश्वासर्हता गमावली आहे. त्यामुळे यूपीए-3 चा प्रयोग यशस्वी होणे, शक्य नाही. त्याऐवजी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी प्रत्येक राज्यात भाजपाची मते कशी फोडता येतील, यावर भर द्यावा, अशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिक आहे. गेल्याच महिन्यात पक्षाच्या राजकीय जाहीरनाम्यात आगामी काळात काँग्रेसशी युती करण्याच्या पर्यायवर काट मारण्यात आली होती. याशिवाय, अन्य कोणत्याही प्रादेशिक पक्षाशी युती न करणार नसल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. त्यानंतर पक्षाने याच भूमिकेचा पुनरुच्चार केल्याने सीपीआयए (एम) काँग्रेससोबत जाण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत.