UPA vs NDA; कोणत्या सरकारच्या काळात सर्वाधिक रोजगार मिळाले? मंत्र्यांनी मांडली आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:51 IST2025-01-02T16:49:26+5:302025-01-02T16:51:19+5:30
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी UPA आणि NDA सरकारमधील रोजगाराची आकडेवारी मांडली.

UPA vs NDA; कोणत्या सरकारच्या काळात सर्वाधिक रोजगार मिळाले? मंत्र्यांनी मांडली आकडेवारी
Employment Rate: केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज देशातील रोजगार संदर्भातील महत्वाची आकडेवारी जारी केली. तसेच, भापच्या नेतृत्वातील NDA आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील UPA सरकारच्या काळातील रोजगाराची तुलनाही केली. त्यांनी सांगितले की, 'देशातील रोजगार गेल्या 10 वर्षात 36 टक्क्यांनी वाढून 2023-24 मध्ये 64.33 कोटी झाला आहे, 2014-15 मध्ये हा 47.15 कोटी रुपयांवर होता.'
एका वर्षात सुमारे 4.6 कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या
आरबीआयच्या माहितीचा हवाला देत मांडविया म्हणतात की, 'यूपीए सरकारच्या काळात, 2004 ते 2014 दरम्यान रोजगारात केवळ सात टक्के वाढ होती. यूपीए सरकारच्या काळात केवळ 2.9 कोटी अतिरिक्त नोकऱ्या निर्माण झाल्या, तर नरेंद्र मोदी सरकारच्या काळात 2014-24 दरम्यान 17.19 कोटी नोकऱ्यांची भर पडली. गेल्या एका वर्षात, म्हणजे 2023-24 मध्ये देशात सुमारे 4.6 कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. ही आकडेवारी एनडीए सरकारच्या कार्यकाळात रोजगाराच्या परिस्थितीत सुधारणा दर्शवते.'
#WATCH | Delhi | On RBI data on employment generation under the NDA government since 2014, Union Minister Mansukh Mandaviya says, "... My claim is based on the truth... RBI releases employment data each year and according to that 2.9 crore jobs were created from 2004 to 2014...… pic.twitter.com/I3JhbGqZ6j
— ANI (@ANI) January 2, 2025
कृषी क्षेत्राबाबत मांडविया म्हणाले की, यूपीएच्या कार्यकाळात 2004 ते 2014 दरम्यान रोजगारामध्ये 16 टक्क्यांनी घट झाली, तर एनडीएच्या कार्यकाळात 2014 ते 2023 दरम्यान 19 टक्क्यांनी वाढ झाली. यूपीए कार्यकाळात उत्पादन क्षेत्रातील रोजगार केवळ सहा टक्क्यांनी वाढला, तर एनडीएच्या कार्यकाळात त्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली. सेवा क्षेत्रातील रोजगार युपीएच्या काळात 25 टक्क्यांनी वाढला होता, तर मोदींच्या कार्यकाळात त्यात 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बेरोजगारीचा दर 3.2 टक्क्यांवर आला
मांडविया पुढे म्हणतात, 2023-24 मध्ये बेरोजगारीचा दर 3.2 टक्क्यांवर येईल, जो 2017-18 मध्ये सहा टक्के होता. गेल्या सात वर्षांत, म्हणजे सप्टेंबर 2017 ते 2024 दरम्यान, 4.7 कोटींहून अधिक तरुण (वय 18-28 वर्षे) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) सामील झाले. संघटित क्षेत्रात नोकऱ्यांमध्ये सहभागी होणा-या तरुणांच्या संख्येतदेखील सातत्याने वाढ होत असल्याचे मांडविया म्हणाले.