वाराणसी (उत्तर प्रदेश) - येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल घेत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून याची सविस्तर माहिती घेतली. आपल्या एकदिवसीय वाराणसी दौऱ्यात विमानतळावर उतरताच त्यांनी पोलिस आयुक्त, विभागीय आयुक्त तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून यासंबंधी माहिती घेऊन आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
प्रकरण काय?१९ वर्षीय तरुणीवर सहा दिवसांत २३ तरुणांनी बलात्कार केल्याचे उत्तर प्रदेश सरकारवर प्रचंड टीका होत आहे. पीडितेला मादक पदार्थ देत विविध हॉटेलात नेण्यात आले व अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
५०वा काशी दौरा२०१४मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदी यांचा हा ५०वा काशी दौरा आहे. मोदी यांनी यावेळी महात्मा जोतिबा फुले यांना आदरांजली वाहून फुले यांच्या सामाजिक एकात्मता व महिला सशक्तीकरणाच्या योगदानाचा गौरव केला.
कुटुंबाला साथ, कुटुंबाचाच विकास; विरोधकांवर टीकावाराणसीत सुमारे ३,८८० कोटी रुपये खर्चाच्या एकूण ४४ प्रकल्पांपैकी काहींच्या कोनशिलांचे अनावरण व काही प्रकल्पांचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी विरोधी पक्षांवर कठाेर टीका केली. या पक्षांनी केवळ कुटुंबाच्या भल्याचाच विचार केल्याचे सांगितले. याउलट आपले सरकार सर्व घटकांना सोबत घेऊन विकास योजना राबवत असल्याचे ते म्हणाले.
ते दिवसरात्र सत्तेसाठी राजकीय खेळ करतातविरोधी पक्षांवर टीका करताना मोदी म्हणाले, ‘जे लोक सत्तेसाठी आसुसलेले आहेत ते दिवसरात्र याच दृष्टीने राजकीय खेळ करतात. ते कायम कुटुंबकेंद्रित विकासावरच लक्ष केंद्रित करतात. सत्तेसाठी असे खेळ खेळणारे लोक केवळ आपल्या कुटुंबाच्याच विकासाचा विचार करतात. ‘कुटुंबाला साथ, कुटुंबाचाच विकास’ हे त्यांचे तत्त्व आहे.’