मदुराई- तामिळनाडूच्या राजकारणार आज आणखी एका सिनेकलाकराचं आगमन होणार आहे. सुपरस्टार रजनिकांत यांच्या पक्ष स्थापनेच्या घोषणेनंतर आता अभिनेते कमल हासन मदुराईमध्ये नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. राजकारणात प्रवेश करण्याआधी कमल हासन बुधवारी सकाळी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरमस्थित घरी गेले आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसंच मच्छिमारांनाही संबोधित केलं.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी ज्या शाळेतून शिक्षण घेतलं त्या शाळेमध्येही कमल हासन जाणार होते. पण नंतर त्यांचा हा कार्यक्रम रद्द झाला. यावेळी माध्यमांशी बोलताना कमल हासन म्हणाले, महानता साधारण घरातून येते हे घर त्यापैकी एक आहे. यामुळे मी प्रभावित झालो आहे. अब्दुल कलाम यांच्या घरी भेट दिल्यानंतर कमल हासन यांनी रामेस्वरममध्ये मच्छिमारांशी संवाद साधला. दुसरीकडे, हासन यांच्या पक्षाच्या घोषणेआधीच राज्यात राजकीय वातावरणात तेजी आली आहे. डीएमकेचे वरीष्ठ नेते एमके स्टॅलिन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं. राजकारणात कागदाच्या फुलांमधून कधीही सुगंध येत नाही, असं त्यांनी पत्रात लिहिलं.
दरम्यान, मी आयुष्याच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. मदुराईतूनच माझ्या सिनेसृष्टीतल यशाची सुरुवात झाली. आता पुन्हा एकदा राजकीय डावाची सुरुवात येथून करत आहे, असं कमल हासन यांनी म्हंटलं. दरम्यान, मदुराईतील ओठकडी मैदानात संध्याकाळी सहा वाजता कमल हासन नव्या पक्षाची घोषणा करतील. त्यांच्या समर्थकांनी तेथे जय्यत तयारीही केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तसेच हासन यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.