नवी दिल्ली-
देशात बहुतांश ठिकाणी गेल्या तासाभरापासून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सर्व्हर डाऊन असून डिजिटल पेमेंट सुविधा ठप्प पडली आहे. व्यवहार पूर्ण होत नसल्यानं ग्राहक देखील वैतागल्याचं चित्रं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर ग्राहक डिजिटल पेमेंट सुविधा पूर्णपणे बंद पडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
ट्विटरवर अनेक युझर्सनं UPI सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे अनेकांना Paytm आणि Gpay च्या माध्यमातून ऑनलाइन पेमेंट करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. दरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानंही (NPCI) यूपीआय सर्व्हर डाऊन असल्याची पुष्टी केली आहे. तसेच ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबद्दल माफी देखील मागितली आहे.
तांत्रिक अडचणींमुळे यूपीआय सर्व्हरमध्ये काही त्रुटी निर्माण झाल्या होत्या. पण सर्व्हर पूर्ववत होण्याचं काम सुरू झालं असून आम्ही संपूर्ण सिस्टमवर लक्ष ठेवून आहोत, असं ट्विट एनपीसीआयनं केलं आहे. दरम्यान, ICICI बँकेनंही यूपीआय सर्व्हर तांत्रिक सुधारणेसाठी काहीकाळ डाऊन असल्याची माहिती दिली आहे.