जम्मू काश्मीर विधानसभेत गुरुवारी (7 नोव्हेंबर 2024) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आर्टिकल 370 वरून जबरदस्त गदारोळ बघायला मिळाला. एवढेच नाही, तर परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. यावेळी पोस्टर्सदेखील फाडण्यात आले. दरम्यान सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यानंतर, 10.20 वाजता पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज सुरू करण्यात आले.
नेमकं काय घडलं? -लांगेटचे अवामी इत्तेहाद पार्टीचे आमदार शेख खुर्शीद हे सभागृहात एक पोस्टर घेऊन पोहोचले होते. त्यांनी हे पोस्टर दाखवले. या पोस्टरवर आर्टिकल 370 बहाल करण्याची मागणी करण्यात आली होती. हे पोस्टर पाहून भाजप नेते तथा विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. भाजपचे आमदार भडकले आणि त्यांनी शेख खुर्शीद यांच्या हातातून पोस्टर हिसकावून घेतले. यानंतर हाणामारीही झाली. भाजप आमदारांनी हे पोस्टर फाडून टाकले. यानंतर भाजप आमदारांनी जबरदस्त गदारोळ केला."नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने भारतमातेच्या पाठीत खंजीर खुपसला" -भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र रैना म्हणाले, "आर्टिकल 370 आता जम्मू-काश्मीरमध्ये इतिहास बनले आहे. ओमर अब्दुल्ला सरकार पाकिस्तानचे मनोबल वाढवत आहे. आर्टिकल 370 ने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद आणि पाकिस्तानी मानसिकतेला जन्म दिला. अशा स्थितीत विधानसभेत 370 चा प्रस्ताव असंवैधानिक पद्धतीने आणणे आणि तो चोरांप्रमाणे घाईघाईने, गुपचूप मांडणे. यातून, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती पुन्हा बिघडवायची आहे, हेच दिसून येते. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने भारतमातेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे."