लोकसभेत ‘शिवी’वरून गदारोळ; अनुराग ठाकूर यांची मला माफी नको, मी लढत राहीन: राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 05:33 AM2024-07-31T05:33:23+5:302024-07-31T05:36:15+5:30
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही जात जनगणना करायलाच लावू, हे विसरू नका. अर्जुनाप्रमाणे मला फक्त माशाचा डोळा दिसतो आणि देशात जात आधारित जनगणना करणारच.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘ज्यांना आपली जात माहीत नाही, ते जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहेत,’ अशी वादग्रस्त टिप्पणी भाजपचे अनुराग ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उद्देशून केल्यानंतर त्यावर आक्षेप घेत गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत तीव्र आक्षेप घेतला. ‘ठाकूर यांनी मला शिव्या दिल्या; पण मला त्यांची माफी नको, मी लढत राहीन,’ असे संतप्त राहुल गांधी म्हणाले.
सभागृहात २०२४-२५ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान भाजपचे अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत काही टीका केली, त्यावरून इंडिया आघाडीने गदारोळ सुरू केला. यावेळी अखिलेश यादव यांनीही ठाकूर यांना सुनावले. पीठासीन अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी काही आक्षेपार्ह आढळल्यास ते तपशिलातून काढून टाकण्यात येईल, असे आश्वासन दिले.
अर्जुनाप्रमाणे मला फक्त माशाचा डोळा दिसतो
राहुल गांधी म्हणाले, “तुम्ही माझा अपमान करू शकता, तुम्ही ते आनंदाने करू शकता. तुम्ही ते रोज करा. पण, एक गोष्ट विसरू नका, की आम्ही जात जनगणना करायलाच लावू. अर्जुनाप्रमाणे मला फक्त माशाचा डोळा दिसतो आणि देशात जात आधारित जनगणना करणारच. अनुराग ठाकूरजींनी मला शिवी दिली आहे. त्यांनी माझा अपमान केला आहे; पण मला त्यांच्याकडून माफी नको आहे. मी एक लढाई लढत आहे.”