नवी दिल्ली: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर चर्चा सुरू असताना समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान यांच्या विधानानं वाद झाला. आझम खान यांनी एक शेर सादर करत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर भाजपाच्या खासदार रमा देवी बसल्या होत्या. त्यांच्याकडे पाहत खान यांनी वादग्रस्त विधान केलं. यामुळे लोकसभेत एकच गोंधळ झाला. यानंतर आझम खान सदनातून बाहेर पडले. तिहेरी तलाकवर चर्चा सुरू असताना रामपूर मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या निवडून आलेले खान बोलायला उभे राहिले. त्यांनी ‘तू इधर-उधर की ना बात कर…’ असा शेर म्हणत बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलेल्या भाजपाच्या खासदार रमा देवी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. 'आप मुझे इतनी लगती है की मेरा मन करता है की आप की आँखो में आँखे डाले रहूँ' असं आझम खान यांनी म्हणताच लोकसभेत गदारोळ झाला. भाजपाच्या खासदारांनी खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यानंतरही खान त्यांच्या विधानावर ठाम राहिले. माझं विधान सदनाच्या कामकाजाच्या दृष्टीनं चुकीचं असल्यास मी राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हणत ते सदनातून निघून गेले. यानंतर आझम खान यांचं विधान कामकाजातून वगळण्यात यावं असे आदेश दिले. विधानसभा, लोकसभा, राज्यसभेच्या कामाकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या खान यांनी त्यांच्या विधानाबद्दल त्वरित माफी मागायला हवी, अशी मागणी कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेचं पावित्र्य प्रत्येकानं जपायला हवं, असं आवाहन केलं. 'संसदेच्या कामकाजातून हे विधान काढा, ते वक्तव्य वगळा, असं म्हणणं सोपं आहे. मात्र अशा मागण्या करण्याची गरजच का भासते? एकदा विधान केल्यावर ते लोकांपर्यंत पोहोचलेलं असतं. त्यामुळे आपण सर्वांनी संसदेचं पावित्र्य जपलं पाहिजे,' असं बिर्ला म्हणाले.