कानपूर:उत्तर प्रदेशात झिका व्हायरसचे(Zika virus) अनेक रुग्ण सापडत आहेत. यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कानपूरमध्ये झिका व्हायरसचे 30 संक्रमित आढळले आहेत. कानपूरच्या चाकेरी भागातील कंटेनमेंट झोनमधून पाठवलेल्या नमुन्यात झिका व्हायरल संसर्गाची पुष्टी झाली आहे. नवीन बाधितांमध्ये 10 महिला आणि 20 पुरुष आहेत. यासह झिका बाधितांची एकूण संख्या 66 वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाने चाकेरी परिसर, हरजेंद्र नगर, एअरफोर्स कॉम्प्लेक्स, पोखरपूर, लालकुर्ती, मोतीनगर, अश्रफाबाद, आदर्शनगर आदी भागातील नमुने पाठवले होते. सीएमओ डॉ. नैपाल सिंह यांनी सांगितले की, 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी 10 महिला आहेत. त्याच वेळी, जिल्हा दंडाधिकारी विशाख जी अय्यर यांनी झिका विषाणूच्या प्रतिबंधासाठी नोडल अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष देण्यास सांगितले आहे.
जिल्हा दंडाधिकारी विशाख जी. अय्यर यांनी शुक्रवारी सांगितले की, कानपूरमध्ये आणखी 30 जणांमध्ये झिका विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. जिल्ह्यात झिका विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना 23 ऑक्टोबर रोजी नोंदवली गेली होती. त्यानंतर ही संख्या 66 वर पोहोचली आहे. हवाई दल केंद्राच्या परिसरातील लोकांचे नमुने गोळा करण्यात आले असून, ते लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
घरोघरी नमुने घेतले जात आहेतअय्यर पुढे म्हणाले की, झिका विषाणूची लागण झालेल्यांमध्ये 45 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश आहे. हा विषाणू डासांमुळे पसरतो. डासांचा नायनाट करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. याशिवाय आरोग्य विभागाचे पथक तापाचे रुग्ण आणि गंभीर आजारी व्यक्तींवर मार्किंग करुन उपचार करत आहेत. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना घरोघरी जाऊन पाळत ठेवण्यासाठी आणि विषाणू चाचणीसाठी नमुने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलद आणि प्रभावी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. झिका व्हायरस प्राणघातक नाहीझिका विषाणू हवेतून किंवा स्पर्शातून पसरत नाही. डास रुग्णाला चावला आणि नंतर दुसऱ्या व्यक्तीला चावला तरच संसर्ग होतो. याशिवाय झिका हा जीवघेणाही नाही. 60 टक्के लोकांना संसर्ग झाला आहे हे देखील माहित नसते. जेव्हा विषाणूचा भार वाढतो तेव्हाच लक्षणे दिसून येतात. तसेच, रुग्ण 7 दिवस ते 14 दिवसात बरा होतो.