UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेतात, मोजक्याच लोकांची यामध्ये निवड होते. त्यापैकी एक म्हणजे केरळच्या कोझीकोडची सारिका ऐके. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सारिकाची धडपड केवळ अभ्यासापुरती मर्यादित नव्हती. तर गंभीर आजाराशी लढा देऊन तिने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे.
सारिका ही मूळची केरळमधील कोझिकोडची आहे. तिला सेरेब्रल पाल्सीसारख्या गंभीर आजाराने ग्रासलं आहे. तिची फक्त तीन बोटं काम करतात आणि ती तिचा उजवा हात देखील वापरू शकत नाही. खूप त्रास सहन करूनही सारिकाने कधीच अभ्यास करणं सोडलं नाही. यावर मात करून सारिकाने आता आपले ध्येय गाठले आहे. सारिका फक्त 23 वर्षांची आहे, तिला या परीक्षेत 922 रँक मिळाला आहे.
आजतकशी बोलताना सारिका म्हणाली की, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती खूप आनंदी आहे. ती म्हणाली, "मुलाखतीला हजर राहण्यासाठी मी व्हीलचेअरने दिल्लीला गेले होते. कतारमध्ये काम करणारे माझे वडील मुख्य परीक्षेसाठी आणि माझ्या मुलाखतीसाठी तिथे माझ्यासोबत आले होते. माझ्या आई-वडिलांनी नेहमीच मला पाठिंबा दिला आहे."
सेरेब्रल पाल्सी ही मेंदू आणि स्नायूंशी संबंधित समस्या आहे. हा आजार लहान मुलांमध्ये आढळतो. हा रोग चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये दिसून येतो. हा आजार संसर्गजन्य नाही. हे मेंदूला झालेल्या नुकसानीमुळे होते, जे सामान्यतः जन्मापूर्वी, दरम्यान किंवा काही काळानंतर उद्भवते. या आजाराची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असतात.