चेन्नई- देशातील महत्त्वाच्या परीक्षेपैकी एक असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षेत खळबळ उडवणारी घटना घडली आहे. या परीक्षेत ‘मुन्नाभाई स्टाईल’ कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हा विद्यार्थी चक्क आयपीएस अधिकारी आहे. सिनेमातील कॉपीची स्टाईल वापरत या विद्यार्थ्याने परीक्षेत कॉपी केल्याची घटना समोर आली आहे. साफीर करीम असं या कॉपी करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे.
साफीर करीम तामिळनाडूत मुख्य परीक्षा देत होता. त्यावेळी त्याला ब्लूटूथद्वारे पत्नीशी संपर्क साधून कॉपी करताना पकडण्यात आलं.आयपीएस साफीरला आयएएस बनायचं होतं, त्यासाठीच तो ही परीक्षा देत होता. सध्या साफीर हा तामिळनाडूतील तिरुनेलवेल्ली जिल्ह्याच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या त्याचा प्रोबेशन पिरीयड सुरु आहे.
परीक्षेत कॉपी करण्यासाठी साफीरने आपल्यासोबत वायरलेस ब्लूटूथ डिव्हाईस ठेवलं होतं. तसंच शर्टाच्या बटनमध्ये मिनिएचर कॅमेरा बसविला होता. वायटरलेस ब्लूटूथ स्पिकरमधून साफीरला प्रश्नांची उत्तर मिळत होती. हैदाराबादमध्ये असणारी साफीर याची पत्नी त्याला प्रश्नांची उत्तरं सांगत होती. त्याचवेळी त्याला परीक्षा केंद्रात पकडण्यात आलं. सध्या पोलिसांनी साफीर करीम आणि त्याची पत्नी जॉइसी जॉय हिला ताब्यात घेतलं आहे.
करीमने परीक्षा केंद्रात जाताना पर्स आणि मोबाइल बाहेर असलेल्या परीक्षाधिकाऱ्यांकडे दिला. गाडीमध्ये ठेवायला विसरल्याचं कारण त्याने दिलं.पण त्याचवेळी दुसरा फोन आणि वायरलेस इअरफोन त्याने त्याच्या पायातील सॉक्समध्ये ठेवला. तीन तासांचा असलेला पेपर सकाळी 9 वाजता सुरू झाला. पेपर सुरू झाल्यानंतर 20 मिनिटांनी आयबी परीक्षाकेंद्रात आली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. चौकशी दरम्यान करीमने कॉपी केल्याची कबुली दिली. प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून पत्नीला पाठविले व तिने त्याची उत्तर दिलं, अशी कबुली त्याने दिली, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पोलिसांनी करीमला फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचणे या कलमांखाली अटक केली आहे. चेन्नई पोलिसांनी हैदराबाद पोलिसांच्या मदतीने साफीरच्या पत्नीलाही अटक केली आहे.
साफीर हा मूळचा केरळमधील रहिवासी आहे. साफीर दाम्पत्य आणि त्यांच्या एका मित्राने इन्स्टिट्यूटही सुरु केली. स्पर्धा परीक्षा, यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे इन्स्टिट्यूट सुरु करण्यात आली होती. तिरुअनंतपूरम, कोच्ची, भोपाळ, हैदराबाद येथे कारिमच्या इन्स्टिट्यूटच्या शाखा आहेत.