नवी दिल्ली - देशात कोरोना महामारीमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेलं लॉकडाऊन संपून आता अनलॉक १ सुरु झालं आहे. त्यामुळे, हळू हळू सर्वकाही पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. अद्याप शाळा आणि महाविद्यालये सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय झाला नसला, तरी युपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, युपीएससी २०२० च्या पूर्व परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 4 ऑक्टोबरपासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे.
लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन युपीएससीच्या पूर्व परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यापूर्वी ३१ मे रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, कोरोना महामारीच्या संकटामुळे देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला होता. त्यामुळए, या परीक्षाही रद्द करण्यात आल्या. त्यानंतर, आता अनलॉक १ सुरू झाल्यानंतर या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
कोरोना महामारीचा देशातील सर्वच शैक्षणिक संस्था आणि स्पर्धा परीक्षांवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांवरही लॉकडाउनचा परीणाम पाहायला मिळाला. अद्यापही या परीक्षा घेण्यात आल्या नसून काही परीक्षा रद्दच करण्यात आल्या आहेत. युपीएससी बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांवरही याचा परिणाम झाला असून युपीएससी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानुसार ४ ऑक्टोबरपासून युपीएससीच्या पूर्व परीक्षांना सुरुवात होणार आहे. तर, मुख्य परीक्षा जानेवारी महिन्यात २०२१ मध्ये घेण्यात येतील. ८ जानेवारीपासून मुख्य परीक्षा होईल. तसेच, युपीएससीच्या फॉरेस्ट विभागाच्या पूर्व परीक्षांचीही घोषणाही करण्यात आली असून २८ फेब्रुवारी २०२१ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. २०१९ मधील युपीएससी परीक्षांच्या मुलाखती २० जुलैपासून सुरु होणार आहेत.
दरम्यान, दरवर्षी युपीएससी परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी परीक्षाला सामोरे जातात. यंदाही १० लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. दरवर्षी साधारणपणे एप्रिल किंवा मे महिन्यात युपीएसी पूर्व परीक्षा पार पडते, तसेच जून महिन्या मुख्य परीक्षा घेण्यात येते. मात्र, यंदाच्या कोरोना महामारी अन् लॉकडाऊनमुळे या परीक्षा उशीरा होत आहेत.