UPSC IAS IPS Result 2023 : प्रयत्न करणाऱ्याला यश मिळतंच असं वडीलधारी माणसं नेहमी सांगत असतात. असंच काहीसं दिल्ली पोलीस दलात सक्रिय असलेल्या जवानाबद्दल झालं आहे. तब्बल आठवेळा अपयश आल्यानंतरही त्यानं जिद्दीच्या जोरावर UPSC परिक्षेचा गड सर केला. मंगळवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर केला. दिल्लीच्या इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक पटकावला, तर ठाण्याच्या कश्मिरा संखे हिने राज्यात पहिला क्रमांक मिळवला.
दरम्यान, दिल्ली पोलिसात कार्यरत असणाऱ्या रामभजन कुमार यांनी आठव्या प्रयत्नात यश मिळवले आहे. आपल्या यशामागे धर्मपत्नीचा मोठा हात असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल राम भजन हे सायबर सेल पोलीस स्टेशनमध्ये तैनात आहेत. त्यांनी आठव्या प्रयत्नात UPSC परिक्षेत ६६७ वी रॅंक मिळवली.
रामभजन यांनी स्वप्न साकार झाल्याचा आनंद साजरा केला. त्यांनी सांगितले की, हा त्यांचा आठवा प्रयत्न होता, ते ओबीसी प्रवर्गातील आहेत, त्यामुळे ते नऊ प्रयत्नांसाठी पात्र आहेत पण हा त्यांचा शेवटचा प्रयत्न होता. "मला वाटले होते की, या वेळी जरी मला यश मिळाले नसते तरी मी पुढच्या प्रयत्नाची तयारी करून पुढे गेलो असतो", असंही त्यांनी सांगितलं.
यशाबद्दल म्हटले... "मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तयारी करत होतो. याशिवाय, माझ्या पत्नीने मला सतत प्रोत्साहन दिले आणि नेहमीच माझी शक्ती म्हणून ती माझ्या पाठीशी उभी राहिली", अशा शब्दांत त्यांनी आपल्या यशाचे श्रेय पत्नीला दिले. कुमार २००९ मध्ये कॉन्स्टेबल म्हणून फोर्समध्ये सामील झाले.