नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने २७ जून रोजी होणारी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला आहे. गुरुवारी याबाबत परिपत्रक काढण्यात आलं. आता ही परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाकडून २७ जून रोजी IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्राथमिक(Preliminary) परीक्षा आयोजित केली होती.
UPSC कडून भारतीय प्रशासकीय सेवा(IAS), भारतीय पोलीस सेवा(IPS) आणि भारतीय विदेश सेवा(IFS) मध्ये अधिकारी निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेते. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे एकून ७१२ पदं नागरी सेवा अंतर्गत परीक्षा घेऊन भरली जाणार होती. यासाठी २७ जून २०२१ रोजी प्राथमिक परीक्षा होती. ४ मार्च २०२१ रोजी या परीक्षेसाठी फॉर्म जारी केले होते. प्राथमिक परीक्षेत पास होणाऱ्या ज्या उमेदवारांना निवडलं जातं त्यांनाच मुख्य परीक्षेला बसला येते.
मागील वर्षी UPSC IAS प्रीलिम्स परीक्षा ३१ मे रोजी होणार होती. परंतु कोविड १९ महामारीमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर ४ ऑक्टोबरला ही परीक्षा देशभरात घेण्यात आली. IAS प्रीलिम्स परीक्षा एक ऑब्जेक्टिव स्वरुपाची परीक्षा असते. जी पेन आणि पेपरच्या माध्यमातून ऑफलाईन घेतली जाते. IAS प्रीलिम्स परीक्षेत २ पेपर असतात. त्या दोन्ही पेपरमध्ये पास होणं बंधनकारक असतं. IAS च्या प्राथमिक परीक्षेत मिळालेले गुण UPSC च्या निकालासाठी ग्राह्य धरले जात नाहीत.