IAS Sreenath K Success Story: तुमची एखाद्या गोष्टीबाबत प्रचंड इच्छाशक्ती असेल तर जगात काहीच अशक्य नाही. या उक्तीला साजेसं काम केरळमधील एका हमालानं करुन दाखवलं आहे. तुमच्या इच्छाशक्तीला जर मेहनत आणि कर्तृत्वाची जोड मिळाली तर तुम्ही समाजासाठी एक प्रेरणास्थान ठरू शकता. केरळच्या एका रेल्वे स्टेशनवर हमालाचं काम करणारा तरुण आज आयएएस अधिकारी बनला आहे. खरंतर देशातील प्रत्येक स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा यश न मिळणाऱ्यांसाठीही ही प्रेरणादायी कहाणी आहे.
केरळच्या श्रीनाथ यानं आयुष्यात कधीच आपल्या प्रतिकुल परिस्थितीला दोष दिला नाही. हाती पैसे नसल्यानं इंटरनेटवरुन माहिती घेऊन अभ्यास करण्यास सुरुवात केली. इंटरनेटच्या रिजार्चसाठीही पैसे खर्च करणं खिशाला परडवणारं नसल्यानं रेल्वेची मोफत WiFi सुविधा श्रीनाथसाठी यशाचं साधन ठरली. रेल्वेच्या मोफत वायफायचा वापर करुन तो हमालीचं काम करता करता स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. काम झाल्यानंतरच्या मोकळ्या वेळेत यूट्यूबवरुन प्रश्नोत्तरं आणि ऑनलाइन फ्री क्लासेसचे व्हिडिओ पाहून त्यानं तयारी केली. यूपीएससीच्या पहिल्या चार प्रयत्नांत श्रीनाथला यश मिळालं नाही. पण हार न मानता त्यानं प्रयत्न सुरूच ठेवले आणि चौथ्या प्रयत्नात यश प्राप्त केलं.
"मी जेव्हा माझ्याबाबत विचार केला तेव्हा मलाही असं वाटलं की आपणही शहरी लोकांप्रमाणे आयुष्य जगायला हवं. त्यामुळेच मी शिक्षणाबाबत विचार केला. अभ्यास आणि काम ही तारेवरची कसरत होती. ती जमत नसल्यानं मी शिक्षण अर्ध्यावर सोडलं होतं. त्यानंतर माझं शिक्षण आता इथंच संपलं असं मला वाटलं होतं. रेल्वे स्टेशनवर मोफत व्हायफाय सेवा उपलब्ध असल्याचं कळलं आणि इंटरनेटवरुनच अभ्यास करण्याचं मी ठरवलं. मोकळ्या वेळेत व्हिडिओ डाऊनलोड करुन ठेवायचो आणि कामाच्या वेळी इअरफोन्स लावून प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ ऐकायचो. केरळ पीएसआयची परीक्षा आली आणि ती दिली. मला त्यात ८२ टक्के गुण मिळाले", असं मोठ्या अभिमानानं आज श्रीनाथ सांगतो.
श्रीनाथच्या यशाची दखल रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही घेतली आहे. त्यांनी श्रीनाथचा एक व्हिडिओ ट्विट करत त्यानं केलेल्या मेहनतीची आणि मिळालेल्या यशाबाबत स्तुती केली आहे. तसंच श्रीनाथला शुभेच्छा दिल्या आहेत. "रेल्वेच्या मोफत वायफायने केरळमध्ये हमाल म्हणून काम करणाऱ्या श्रीनाथच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणला आहे, स्टेशनवर उपलब्ध असलेल्या वायफायचा वापर करून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करून यश मिळवलं आहे, त्याच्या या यशाबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला शुभेच्छा देतो", असं ट्विट पियुष गोयल यांनी केलं आहे.