नवी दिल्ली: 'कोशिश करने वालों की हार नहीं होती...' हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळी यूपीएससी(UPSC) परीक्षेत तंतोतंत खऱ्या ठरतात. काही दिवसांपूर्वीच UPSC 2022 चा निकाल लागला आणि या निकालात मैनपुरी येथील रहिवासी असलेल्या सुरज तिवारीने या ओळी खऱ्या ठरवल्या आहेत.
रेल्वे अपघातात दोन्ही पाय आणि एक हात गमावलेल्या सूरजने यूपीएससी परीक्षेत 917 वा क्रमांक पटकावला आहे. या यशानंतर सर्वच स्तरातून सुरजचे कौतुक होत आहे. सुरजचे यश सर्वांना दिसले, पण त्यामागची त्याची मेहनत फार थोड्या लोकांना माहिती आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी खरंच इतरांना प्रेरणा देऊन जाते.
दरम्यान, सुरज तिवारीने त्याच्या युपीएससी परीक्षेच्या मुलाखतीत घडलेला एक किस्सा सांगितला. यावेळी अधिकाऱ्याने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना सुरजने सर्वांनाच चकीत केले. अधिकाऱ्याने प्रश्न विचारला की, तुम्ही स्पेशल कॅटेगरीतून येता. तुमची निवड झाल्यावर, तुमच्या कॅटेगरीतील लोकांसाठी कोणत्या योजना राबवाल?
या प्रश्नाला उत्तर देताना सुरज म्हणाला की, माफ करा सर, मी कोणत्याही स्पेशल कॅटेगरीतून आलेलो नाही. मी तुमच्याप्रमाणे सर्व काही करण्यास सक्षम आहे. यावेळी सुरजचे उत्तर ऐकून पॅनेलमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याचे जोरदार कौतुक केले.
रेल्वे अपघातात पाय गमावले24 जानेवारी 2017 रोजी दादरी-गाझियाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात सुरजने त्याचे दोन्ही पाय, उजव्या आणि डाव्या हाताची बोटे गमावली होती. यानंतर तो चार महिने रुग्णालयात राहिले, त्यानंतर तीन महिने घरीच विश्रांती घेतली. यानंतरही सुरजने हार मानली नाही. अपघातानंतर 2018 मध्ये त्याने जेएनयू दिल्लीत बीएमध्ये नव्याने प्रवेश घेतला. तेथून 2021 साली बीए पास करून एमएला प्रवेश घेतला. लहानपणापासूनच हुशार सूरज तिवारी अभ्यासासोबत यूपीएससीची तयारी करत राहिला. अखेर त्याला यश मिळाले.