जयपूर: असं म्हणतात की एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द आणि विश्वास असेल तर तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीतही यशाचे शिखर गाठू शकता. असेच काहीसे राजस्थानमधील एका ट्रक ड्रायव्हरच्या मुलाने करुन दाखवले आहे. अतिशय गरिब परिस्थितीत एका ड्रायव्हरच्या मुलाने अत्यंत कठीण असणारी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करुन IAS पद मिळवले आहे.
वडील ट्रक ड्रायव्हर, मुलगा IASयशाचा झेंडा रोवणारा हा होतकरू विद्यार्थी म्हणजे पवनकुमार कुमावत. पवनने देशभरातून 551वा क्रमांक मिळवला आहे. पवन हा मूळचा नागौर जिल्ह्यातील सोमणा येथील रहिवासी आहे. त्याचे वडील रामेश्वरलाल यांनी ट्रक चालवून मुलाला शिकवले. गावातील सरकारी शाळेत पवनचे शिक्षण झाले. वडील ट्रक ड्रायव्हर होण्यापूर्वी गावातच मातीची भांडी बनवायचे. आपल्या मुलाला शिकवण्यासाठी त्यांनी गाव सोडले आणि नागौरला राहू लागले. काही काम न मिळाल्याने ते ट्रक चालवू लागले. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी राजधानी जयपूर गाठले.
आजीच्या मंत्राने यश मिळवून दिलेपवनने सांगितले की, मी खूप भाग्यवान आहे की मला असे पालक मिळाले, ज्यांनी माझे करिअर घडवण्यासाठी रात्रंदिवस एक केले. त्यांनी फक्त माझ्या यशाचे स्वप्न पाहिले. पवानकुमारचे आयुष्य अतिशय गरिबीत गेले. घरात लाईट कनेक्शन नव्हते. कधी-कधी त्यांचे वडील आजूबाजूच्या घरातून कनेक्शन घेत असत. कधी कंदील किंवा चुलीच्या आगीत अभ्यास करावा लागत असे. पवान यांची आजी म्हणायची की देवाच्या घरी अंधार नसतो. तुझे काम करत रहा, परिणामाची काळजी करू नका. हे ब्रीदवाक्य मनात ठेवून पवनकुमार यांनी रात्रंदिवस अभ्यास केला.
वर्तमानपत्राची हेडलाईन पाहून आयएएस होण्याचा निर्धार केलापवनच्या या यशामागे त्याचा आत्मविश्वास आणि जिद्द आहे. त्यांनी सांगितले की, 2006 मध्ये रिक्षाचालकाचा मुलगा गोविंद जैस्वाल आयएएस अधिकारी झाला होता. वर्तमानपत्रात त्याची बातमी आली, तेव्हाच मी त्याची हेडलाईन पाहिली आणि ठरवले की आता मी पण आयएएस होणार. कॉलेज आणि कोचिंगची फी भरायला पैसे नव्हते, वडिलांनी कर्ज घेऊन शिकवल्याचे पवन सांगतो. आता या सर्व परिश्रमाचे फळ पवनकुमार यांना मिळाले आहे.