वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकीने खूप संघर्ष केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. रितिका जिंदल असं या तरुणीचं नाव असून तिने अगदी लहान वयात UPSC परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून आपल्या कुटुंबीयांचं नाव मोठं केलं आहे. पंजाबची रहिवासी असलेली रितिका लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिला बारावीत खूप चांगले गुण मिळाले होते, तिने उत्तर भारतात टॉप केलं होतं. त्यानंतर तिची आयएएस होण्याची इच्छा होती.
लहानपणापासूनच काहीतरी मोठं करायचं स्वप्न होतं, म्हणून तिने ग्रॅज्युएशननंतर यूपीएससीची तयारी करायला सुरुवात केली. रितिका प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण झाली पण शेवटच्या टप्प्यात काही गुणांनी मागे राहिली. पण तिने हार न मानता तयारी सुरू ठेवली आणि पुन्हा एकदा पेपर द्यायचे ठरवले. रितिकाने तिचा पुढचा प्रयत्न केला ज्यामध्ये तिला ८८ वा रँक मिळाला. जेव्हा तिने परीक्षा उत्तीर्ण केली तेव्हा ती फक्त २२ वर्षांचा होती. मात्र, आयएएस होण्याचा प्रवास सोपा नव्हता.
रितिका जिंदल जेव्हा यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती तेव्हा तिला कळलं की, तिच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच खचलं. वडिलांवर खूप प्रेम करणाऱ्या मुलीच्या पायाखालची जमीन सरकली होती. अशा परिस्थितीत परीक्षेची तयारी करणं सोपं नव्हतं. एका मुलाखतीत रितिकाने सांगितलं होतं की, तिचं घर एका छोट्या गावात आहे. जिथे संसाधनं आणि पायाभूत सुविधांचा अभाव होता. यामुळे वडिलांना लुधियाना येथे उपचारासाठी घेऊन जावं लागलं.
रितिका सांगते की, ती ट्रेनिंगवर असताना असताना तिचे आई-वडील वारले. वडिलांच्या मृत्यूचे कारण कॅन्सर होतं, वडिलांच्या मृत्यूच्या दोन महिन्यांतच तिच्या आईचाही कॅन्सरनेच मृत्यू झाला. पण रितिकाच्या मनात तिच्या आई-वडिलांचं स्वप्न होतं, त्यांच्या मुलीने समाजाला मदत करावी अशी त्यांची इच्छा होती. तिने आपल्या पालकांचं स्वप्न पूर्ण केलं.