यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा पास होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. पण सर्वांनाच यामध्ये यश मिळतं असं नाही. या स्वप्नाचा पाठलाग करताना अनेक समस्यांचा देखील सामना करावा लागतो. काही विद्यार्थी या परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप मेहनत घेतात. दररोज तासनतास अभ्यास करुनही अनेकांच्या वाट्याला अपयश येतं. पण हरियाणाच्या देवयानी सिंहची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. तिने आठवड्यातून फक्त 2 दिवस अभ्यास करून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
द बेटर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, देवयानी सिंहने चंदीगडच्या शाळेतून दहावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर देवयानीने 2014 मध्ये बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिलानीच्या गोवा कॅम्पसमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये तिने पदवी पूर्ण केली. इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.
देवयानी सिंहला परीक्षा देताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सलग तीन वेळा अपयश आल्यानंतर यश मिळाले. देवयानी 2015, 2016 आणि 2017 च्या यूपीएससी परीक्षेत नापास झाली होती. पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात देवयानीला पूर्वपरीक्षाही पास करता आली नाही. तर तिसऱ्या प्रयत्नात ती मुलाखत फेरीपर्यंत पोहोचली. पण तिचे नाव अंतिम यादीत आले नाही. सलग तीनवेळा अपयश आल्यानंतरही तिने हार न मानता कठोर परिश्रमाने तयारी सुरू ठेवली.
देवयानी सिंह हिने 2018 च्या यूपीएससी परीक्षेत प्रथमच यश मिळवले आणि संपूर्ण भारतात 222 वा क्रमांक मिळवून केंद्रीय लेखापरीक्षण विभागात तिची निवड झाली. यानंतर तिने प्रशिक्षण सुरू केले. यूपीएससी परीक्षेची तयारीही सुरू ठेवली. यानंतर 2019 च्या परीक्षेत देवयानीने संपूर्ण भारतात अकरावा क्रमांक पटकावला.
आठवड्यातून फक्त 2 दिवस अभ्यास
2019 मध्ये केंद्रीय लेखापरीक्षण विभागात निवड झाल्यानंतर देवयानी सिंहने प्रशिक्षण सुरू केले. यामुळे तिला यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी जास्त वेळ मिळत नव्हता. त्यामुळे ती फक्त शनिवार आणि रविवारच्या दिवशीच अभ्यास करायची. मात्र त्या काळात ती कसलेही टेन्शन न घेता अभ्यास करायची आणि किती तास अभ्यास करते हे कधीच पाहायची नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"