नवी दिल्ली : संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांसह अनेक पक्षांनी महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडण्याचा आग्रह धरला.
सर्वपक्षीय बैठकीत अनेक नेत्यांनी सांगितले की, दीर्घकाळ प्रलंबित हे विधेयक मांडले जावे आणि ते सर्वांच्या सहमतीने मंजूर होऊ शकते. या विधेयकात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांनी संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी केली आहे.
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही सरकारला या संसदेच्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचे आवाहन करतो. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी संसद नवीन इमारतीत स्थलांतरित होणार असल्याचे पटेल यांनी सांगितले.
नव्या संसद भवनात उद्या प्रवेश, पहिल्या दिवशी जुन्या संसद भवनात अधिवेशन होणार आहे. दुसऱ्या दिवशी दि. १९ सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनात फोटो सेशन होईल त्यानंतर सकाळी ११ वाजता सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम होईल. त्यानंतर खासदार नव्या संसदेत प्रवेश करतील. नव्या संसदेत १९ सप्टेंबरपासून संसदेचे अधिवेशन सुरु होईल आणि २० सप्टेंबरपासून नियमित सरकारी कामकाज सुरु होईल.