डेहराडून : रोहिंग्या मुस्लीम आणि आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा (एनआरसी) अंतिम यादीवरुन राजकीय वाद-विवाद सुरु आहे. सरकार आणि विरोधकांकडून सतत याविषयी आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यातच आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यात कोणीही संशयित व्यक्ती दिसला की जनतेने यासंदर्भात सरकारला कळवावे, त्यांना राज्यातून बाहेर काढू, असे त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटले आहे.
त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले, कोणत्याही घुसखोराला, बांगलादेशी असो किंवा रोहिंग्या.. प्रत्येकाला सीमेच्या पलीकडे पाठविले जाईल. मी उत्तराखंडमधील जनतेला सांगू इच्छितो की, तुम्हाला कोठेही संशयित व्यक्ती दिसल्यास सरकारला त्याबद्दलची माहिती द्या. आम्ही एकेकाला बाहेर हाकलून देऊ.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनच्या अंतिम यादीत नावे नसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही, त्यांना देश सोडून जावे लागेल, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे महासचिव राम माधव यांनी केले होते. गेल्या सोमवारी दिल्लीत 'एनआरसी: डिफेंडिंग द बॉर्डर्स, सेक्युरिंग द कल्चर' या विषयावर आयोजित एका कार्यक्रमात राम माधव बोलत होते. ते म्हणाले, 1985 मध्ये झालेल्या करारानुसार नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनच्या यादी अपडेट करण्यात येत आहे. सरकारने राज्यात अवैधरित्या राहाणाऱ्या नागरिकांची माहिती काढून त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितले होते. आता नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनमुळे आसामध्ये अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांची एक वेगळी ओळख निर्माण होईल. मात्र, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनच्या अंतिम यादीत नावे नसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही. त्यांना देश सोडून जावे लागणार, असे राम माधव म्हणाले होते. जगातील कोणताही देश अवैध्यरित्या घुसखोरी केलेल्या लोकांना आपल्या देशात राहू देत नाही. परंतू भारतात राजकीय कारणांमुळे अशा लोकांसाठी धर्मशाळाच बनली आहे, असेही राम माधव यावेळी म्हणाले होते.
(राम माधव यांचा 3D फॉर्म्युला, म्हणाले NRC नंतर डिटेक्ट, डिलीट, डिपोर्ट करणार...)