नवी दिल्ली : आध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयात तातडीने ब्रेन सर्जरी करण्यात आली. रुग्णालयाच्या एका वरिष्ठ डॉक्टरने बुधवारी ही माहिती दिली.
सद्गुरूच्या मेंदूतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. स्वत: सद्गुरूंनीच याबाबत व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली.
अपोलो रुग्णालयाने माहिती देताना सांगितले की, मेंदूतील रक्तस्राव थांबविण्यासाठी १७ मार्च रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सद्गुरूंना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सतत सुधारणा होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आध्यात्मिक गुरुंशी संवाद साधत लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सद्गुरू जग्गी वासुदेवजी यांच्याशी बोललो आणि त्यांना चांगले आरोग्य आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, असे मोदींनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
सद्गुरुंनी तत्काळ मोदींच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत म्हटले की, पंतप्रधानांच्या काळजीने मी भारावून गेलो आहे. प्रिय पंतप्रधान, तुम्ही माझी काळजी करू नका. देशासाठी तुमच्याकडे अनेक कामे आहेत. मी ठीक होण्याच्या मार्गावर आहे, धन्यवाद असे म्हटले आहे.