नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. सर्जिकल स्ट्राइकमध्ये भारतीय लष्करानं रॉकेट लाँचर, मिसाइल आणि छोट्या शस्त्रास्त्रांनी हल्ला चढवला होता.
दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमधल्या भारतीय लष्कराच्या तळावर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हे सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते.
भारतीय लष्कराच्या पराक्रमाची संपूर्ण कहाणी...
- जैश-ए-मोहम्मद फिदाइन दस्ते या दहशतवादी संघटनेकडून भारतातील उरी बेस कॅम्पवर हल्ला करण्यात आला होता. यावेळी जवानांनी खात्मा केलेल्या दहशतवाद्यांकडून जीपीएस सेट्स जप्त केले होते. त्यातून स्पष्ट झाले होते की या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात होता. पाकिस्तानच्या रेंजर्सनी दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत केली होती. या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली होती.
- यानंतर 28 सप्टेंबर 2016 रोजी रात्री भारतीय लष्काराने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केले. सर्जिकल स्ट्राइकच्यावेळी शत्रूंच्या रडार यंत्राची नजर चुकविण्यासाठी 30 जवानांची एक टीम तैनात होती. तसेच, भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सच्या 7 तुकड्यांनी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानचे बॅरिकेड्स ओलांडून कामगिरी केली होती. या तुकड्यांमध्ये 150 जवान होते.
- सर्जिकल स्ट्राइच्याआधी पाकिस्तानमधील लॉंचिग पॅड्सवर गुप्तहेर संघटना एक आठवडा लक्ष ठेवू होत्या. रॉ आणि मिलिट्री इंटेलिजेंस दहशतवाद्यांच्या हालचालीवर पाळत ठेऊन होते. भारतील लष्कराने हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमधील एकूण सहा कॅम्पवर लक्ष ठेवले होते. हल्ल्याच्यावेळी तीन कॅम्प पूर्णपणे उद्धवस्त केले.
- तत्कालीन डीजीएओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी सर्जिकल स्ट्राइक केल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषद घेवून सांगितली होती. ते म्हणाले होते, भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले. यामध्ये शत्रूंचे मोठे नुकसान झाले. रात्री साडे बारा वाजता सुरु करण्यात आलेले हे ऑपरेशन सकाळी साडेचार वाजता संपविले.
- दरम्यान, सर्जिकल स्ट्राइकच्यावेळी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि लष्करप्रमुख दलबीर सिंह सुगाह सतत ऑपरेशनसंबंधी माहिती घेत होते. तसेच, या ऑपरेशनची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना सुद्धा देण्यात येत होती.
- भारतीय लष्कराकडून करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राइकचे वृत्त पाकिस्ताने त्यावेळी फेटाळले होते. मात्र, आता या सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे पुन्हा पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आला आहे.