अमृत महोत्सवी स्वातंत्रदिनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना दोन दिवसांत दोन मोठे दहशतवादी कट उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पुलवामामध्ये मोठ्या प्रमाणावर आयईडी स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. असे असताना उरी हल्ल्यासारखा भारतीय जवानांच्या कॅम्पवर हल्ला करण्याचा प्रयत्न लष्कराने उधळून लावला आहे.
रात्रीच्या अंधारात काही दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील परगल आर्मी कॅम्पच्या कुंपणाच्या तारा कापल्या होत्या. यातून ते कॅम्पमध्ये प्रवेश करणार होते. तेवढ्यात डोळ्यात तेल घालून गस्त घालणाऱ्या जवानांच्या हा प्रकार लक्षात आला आणि पलिकडून गोळीबार सुरु झाला. याला प्रत्यूत्तर देताना दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तर तीन जवान शहीद झाले आहेत.
11 राष्ट्रीय रायफल बटालियनकडून मिळालेल्या माहितीनुसार राजौरीच्या परगल तळामध्ये काही लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही बाजुंनी फायरिंग झाली. सहा किमीच्या परिसराला लष्कराने वेढले असून सर्च ऑपरेशन जारी आहे. धरहल पोलीस स्टेशनपासून सहा किमीच्या परिसरात लष्कराच्या दुसऱ्या तुकड्या देखील तैनात केल्या गेल्या आहेत. दहशतवाद्यांनी उरीसारखा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे.
2016 मध्ये पाकिस्तानातून आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये १९ जवान शहीद झाले. त्याचवेळी 19-30 सैनिक जखमी झाले. चारही दहशतवादी मारले गेले. प्रत्युत्तर म्हणून, भारताने पीओकेमध्ये प्रवेश केला आणि सर्जिकल स्ट्राइक केले आणि दहशतवादी लॉन्च पॅड नष्ट केले.