नवी दिल्ली : नोटाबंदी हा झटका नव्हता. तर वर्षभरापासून वारंवार इशारा दिला होता. जर तुमच्याकडे काळा पैसा असेल, तर तो बँकेत जमा करा, त्यावरील दंड भरा आणि मोकळे व्हा. मात्र, त्यांनी मोदी इतरांसारखेच वागतील असा समज करून घेतला आणि काहीच जण पुढे आले. यामुळे नोचाबंदी करावी लागली, असा खुलासा मोदी यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळातली पहिलीच मुलाखत एएनआय वृत्तसंस्थेला दिली. यावेळी त्यांनी राम मंदिर, नोटाबंदी, उर्जित पटेल या सारख्या विषयांवर भाष्य केले.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे अर्थमंत्री असतानाही जीडीपी घसरला होता. त्यावेळी बदल होत होते. आताही होत आहेत. यामुळे जीडीपी घसरू शकतो. काळा पैसा घेऊन देशाबाहेर पसार झालेले पुन्हा देशात आणले जातील. यासाठी कायदे बनविले आहेत. परदेशी सरकारांकडेही पाठपुरावा सुरु आहे. यामुळे देशाला लुबाडून गेलेल्या सर्वांनाच भारतात कधी ना कधी यावेच लागेल, काळा पैसाही भारतात येईलच, असा इशारा त्यांनी दिला.
रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी सहा महिन्यांपूर्वीच वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. यामुळे राजकीय दबावाचा प्रश्नच येत नसल्याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी य़ांनी केला आहे. राजीनामा देण्याआधी 6-7 महिन्यांपूर्वीच पटेल आपल्याकडे आले होते. त्यांनी तसे लेखी दिलेही आहे. यामुळे पटेल राजकीय दबावाला बळी पडल्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी गव्हर्नर म्हणून चांगले काम केल्याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.