- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
अनुभवी बँकर आणि निष्णात अर्थतज्ज्ञ डॉ. ऊर्जित आर. पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. रघुराम राजन यांची मुदत येत्या ४ सप्टेंबर रोजी संपत आहे.डॉ. पटेल यांच्या नियुक्तीची घोषणा शनिवारी झाली. ५२ वर्षांचे डॉ. पटेल हे रिझर्व्ह बँकेच्या पाच डेप्युटी गव्हर्नरपैकी एक आहेत. संपुआ सरकारने केलेल्या तीन वर्षांच्या नियुक्तीची मुदत संपल्यावर मोदी सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. ते रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर होतील. गव्हर्नरपदी नियुक्ती होणारे ते आठवे डेप्युटी गव्हर्नर असतील. यापुढे वित्तीय धोरण व व्याजदर रिझर्व्ह बँक व सहा सदस्यांची समिती मिळून ठरविणार आहे. या समितीवर जाणारे व तिच्या रचनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. पटेल हे पहिले गव्हर्नर असतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)- डॉ. पटेल यांच्या निवडीने महिनाभराची उत्कंठा संपली असली तरी जाणकारांना त्यांची निवड अनपेक्षित मात्र नाही. देशाच्या पतधोरणासाठी जो नवा आराखडा लागू केला जायचा आहे तो ज्या शिफारशींवर आधारित आहे त्या डॉ. पटेल यांच्याच अध्यक्षतेखालील समितीने केल्या होत्या. - डॉ. राजन यांच्या काळात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विभागाची धुरा डॉ. पटेल यांच्याकडेच होती. त्यामुळे ज्या पतधोरणाची जडणघडण त्यांनी केली ते पुढे नेण्याचे काम डॉ. पटेल यांना करावे लागणार आहे. दांडगा अनुभव- डॉ. ऊर्जित पटेल यांचा जन्म २८ आॅक्टोबर १९६३.- अर्थशास्त्रातील पदवी-लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स.- एम. फिल-आॅक्सफर्ड विद्यापीठ.- अर्थशास्त्रातील डॉक्टरेट - येल विद्यापीठ (अमेरिका)- १९९०-९५ : आयएमएफमध्ये- १९९६-९७ - नाणेनिधीतून रिझर्व्ह बँकेत प्रतिनियुक्ती.- १९९८-२००१ - केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार.- रिलायन्स इंडस्ट्रिज व आयडीएफसीमध्ये उच्च पदांवर.- अनेक महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्ष, सदस्य