मुंबई - प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तिला काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र उर्मिला मातोंडकर हिने सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून सोशल मीडियावर तिच्याविषयी उलटसुटल दावे करण्यात येत आहेत. उर्मिला ही सरसंघचालक मोहन भागवत यांची पुतणी असल्याचा तसेच काश्मिरी तरुण मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत विवाह केल्यानंतर तिने धर्मपरिवर्तन करून मरियम अख्तर मीर किंवा फरझाना मीर असे नाव धारण केल्याच्याही बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र सत्य परिस्थिती वेगळीच आहे. उर्मिला मातोंडकर ही सरसंघचालक मोहन भागवत यांची पुतणी असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र याबाबत काही प्रसारमाध्यमांनी थेट उर्मिला मातोंडकरकडे विचारणा केली असता तिला हे ऐकून धक्का बसला. आपले आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचे कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध असल्याचे तिने फेटाळून लावले. हे म्हणजे सिनेमाच्या कथानकापेक्षाही अकल्पनीय आहे. यात कोणतीही सत्यता नाही, असा दावा तिने केला. तसेच उर्मिलाने काश्मिरी तरुण मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत विवाह केल्यानंतर धर्मपरिवर्तन करून मरियम अख्तर मीर किंवा फरझाना मीर असे नाव धारण केल्याचे दावेही केले जात आहेत. मात्र उर्मिलाचा पती मोहसीन अख्तर मीर याने हा दावाही फेटाळला आहे. इतर सिने कलाकारांप्रमाणेच तिनेही नाव बदललेले नाही. तसेच माझेही आडनाव आपल्या नावासमोर लावलेले नाही. तसेच तुम्ही माझ्या घरी आलात तर तिथे तुम्हाला मंदिरही आढळेल. त्याबरोबरच माझ्या घरात काम करणाऱ्या व्यक्तींनाही तुम्ही विचारू शकता ते सुद्धा सांगतील की उर्मिलाने धर्मपरिवर्तन केलेले नाही. मात्र असे असले तरी उर्मिला मातोंडकरविषयी सोशल मीडियावर उलटसुटल पोस्ट व्हायरल होत आहेत. पण अधिक पडताळणी केली असता यापैकी बहुतांश पोस्ट खोट्या असल्याचे सिद्ध होत आहे. तसेच तिचे सरसंघचालक मोहन भागवतांशी असलेले नातेसंबंध नसल्याचे आणि तिने धर्मपरिवर्तन करून नाव बदलले नसल्याचेही सिद्ध होत आहे.
उर्मिला मातोंडकर सरसंघचालक मोहन भागवत यांची पुतणी आहे? जाणून घ्या व्हायरल सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 4:04 PM