न्यू यॉर्क: पाकिस्तानी हवाई दलाच्या ताफ्यातील सर्व एफ-16 विमानं सुरक्षित असल्याचा दावा अमेरिकेच्या एका मासिकानं केला आहे. पाकिस्तानचं एफ-16 पाडल्याचा भारताचा दावा चुकीचा असू शकतो, असं 'फॉरेन पॉलिसी' या मासिकानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं मासिकानं हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या दोन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन वृत्त दिल्याचं मासिकानं म्हटलं आहे. पाकिस्ताननं अमेरिकेकडून एफ-16 विमानं खरेदी केली होती. या विमानांची मोजदाद केल्यास ती योग्यच असल्याचं दोन अधिकाऱ्यांनी मासिकाला सांगितलं. एक एफ-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा विचारात घेतल्यास पाकिस्तानच्या ताफ्यात एक विमान कमी असायला हवं होतं. मात्र तसं झालेलं नाही, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राइक केला. यानंतर 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला.27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या हवाई दलांमध्ये आकाशात चकमक झाली. या दरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 मधून पाकिस्तानच्या एफ-16 वर निशाणा साधला. अभिनंदन यांच्या अचून निशाण्यामुळे एफ-16 विमान कोसळलं, अशी माहिती हवाई दलानं पत्रकार परिषदेत दिली. याच पत्रकार परिषदेत हवाई दलानं आमरार क्षेपणास्त्राचे काही तुकडेदेखील दाखवले. पाकिस्तानच्या ताफ्यातील केवळ एफ-16 विमानच आमरार क्षेपणास्त्र डागू शकतं. त्यामुळे पाकिस्ताननं भारताविरोधात एफ-16 चा वापर केला, हे सिद्ध होतं, असा दावा हवाई दलानं केला होता.
पाकिस्तानचं F-16 पडलंच नाही?; अमेरिकन मासिकाच्या दाव्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 1:46 PM