नवी दिल्ली : भारताच्या काही वस्तूंवर वाढीव आयात कर लावणाऱ्या अमेरिकेला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले असून, २९ अमेरिकी उत्पादनांवरील आयात करात वाढ केली आहे. डाळी, लोह व पोलाद उत्पादने आणि रसायने यांचा त्यात समावेश आहे.आयात करातील ही वाढ ४ आॅगस्टपासून लागू होईल, असे वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे. भारत सरकारने याआधीच याची घोषणा केली होती. ती आता प्रत्यक्षात अमलात येईल.अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबत संरक्षणवादी धोरण स्वीकारून आयात करात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे युरोपीय संघाने तसेच चीनने अमेरिकी वस्तूंवर वाढीव आयात कर लावला आहे. याचा परिणाम म्हणून व्यापारी युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता भारतानेही अमेरिकी वस्तूंवर वाढीव आयात कर लावला आहे.>भारताला आर्थिक फटकारोगनिदान घटक द्रव्यांवरील आयात कर दुपटीने वाढवून २० टक्के तर फौंड्री क्षेत्रातील साच्यांच्या बंधकावरील कर १७.५ टक्के केला आहे. लोहावरील आयात कर १५ वरून २७.५० टक्के, तर स्टेनलेस स्टीलवरील कर १५ वरून २२.५० टक्के केला आहे. अमेरिकेने भारतातून आयात होणाºया लोह व अॅल्युमिनियम उत्पादनांवर आयात कर वाढविला आहे. त्यामुळे भारताला २४.१ कोटी डॉलरचा फटका बसणार आहे. याच्या उत्तरात भारताने ही कारवाई केली.>कशावर किती कर आकारला जाणार?वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, अमेरिकेतून आयात होणारे वाटाणे, चणे व मसूर डाळीवरील आयात कर ३० वरून ७० टक्के केला आहे. फोडलेल्या बदामावर आयात कर १०० वरून १२० रुपये इतका होणार आहे. सालासह बदामावरील आयात शुल्क ३५ रुपये किलोवरून ४२ रुपये किलो इतके करण्यात आले आहे. अक्रोडवरील आयात कर ३० टक्क्यांवरून १२० टक्के, सफरचंदावरील कर ५० टक्क्यांवरून ७५ टक्के, बोरिक अॅसिडवरील कर १७.५० टक्के, फॉस्परिक अॅसिडवरील कर १० वरून २० टक्के इतका करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या २९ वस्तूंवरील आयात करात केली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:09 AM