नवी दिल्ली : इराकची राजधानी बगदादच्या विमानतळावर अमेरिकेने हवाई हल्ला करून इराणच्या मेजर जनरल कासीम सुलेमानी या लष्करी अधिकाऱ्याला ठार केले. या हल्लानंतर इराणने पुन्हा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला केला. त्यामुळे इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी इराण, ओमान, यूएई आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी आखाती देशात वाढत्या संघर्षामुळे होत असलेल्या परिणामांची जाणीव करून देत तणावाची भारताला चिंता असल्याचे सांगितले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणमधील जवाद जरीफ यांच्याशी चर्चा केल्यानंतर ट्विट केले आहे. 'इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा झाली आहे. सध्याच्या घडामोडींनी गंभीर वळण घेतले आहे. भारत या तणावाच्या वातावरणामुळे चिंतित आहे. आम्ही संपर्कात राहू असे त्यांनी म्हटल्याचे एस. जयशंकर यांनी सांगितले.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पोम्पिओ यांच्याशी चर्चा करून त्यांना भारताच्या अडचणींची जाणीव करून दिली. यावेळी एस. जयशंकर म्हणाले की, आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीबाबत माइक पोम्पिओ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. भारताच्या हिताबाबत आणि काळजीच्या गोष्टींची माहिती त्यांना दिली. याचबरोबर, ओमानच्या मंत्र्यांसोबतही एस. जयशंकर यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी ट्विट केले की, आखाती देशात सुरु असलेल्या तणावावरून ओमानचे परराष्ट्र मंत्री यूसुफ अलावी यांच्याशी चर्चा केली. तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली.
दरम्यान, इराणचे मेजर जनरल कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने जर प्रत्युत्तरात काही कारवाई केली, तर त्यांच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करण्यात येतील, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. अमेरिकी ड्रोन हल्ल्यात बगदादमध्ये जनरल सुलेमानी (६२) मारले गेले. त्याचा बदला घेण्याचा संकल्प इराणने केला आहे. यामुळे या दोन देशांत तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी असा इशारा दिला आहे की, जर इराणने अमेरिकी सैन्य कर्मचारी आणि संपत्तीवर हल्ला केला, तर इराणमधील ५२ ठिकाणांना लक्ष्य करण्यात येईल. यातील काही स्थळ इराण आणि इराणी संस्कृतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.