ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला गती मिळू नये यासाठी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी 1992 साली भारताला क्रायोजेनिक इंजिनचे तंत्रज्ञान देण्यापासून रशियाला रोखले होते तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोवर अनेक निर्बंध आणले होते. आज दोन दशकानंतर त्याच अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था आणि इस्त्रो मिळून जगातील सर्वात महागडया नीसार उपग्रहाची निर्मिती करत आहेत.
महत्वाचे म्हणजे 2021 साली जीएसएलव्ही रॉकेटव्दारे नीसार उपग्रहाचे प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. हे तेच रॉकेट आहे ज्यामध्ये वापरण्यात आलेल्या क्रायोजेनिक इंजिनचे तंत्रज्ञान भारताला मिळू नये म्हणून अमेरिकेने निर्बंध आणले होते. नीसार उपग्रह विकसित करण्यावर दोन्ही देशांना 1.5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त खर्च येणार आहे. त्यावेळी अमेरिकेने केलेल्या खोटेपणाकडे दुर्लक्ष करत इस्त्रो नासासोबत मिळून 2200 किलो वजनाच्या नीसार उपग्रहावर काम करत आहे.
नीसारमधल्या अत्याधुनिक रडार इमॅजिंग सिस्टिममुळे पृथ्वीची सखोल माहिती मिळणार आहे. हा उपग्रह निरीक्षण आणि पृथ्वीवरील जटील प्रक्रियांची छायाचित्रे मिळवणे या दुहेरी उद्देशाने बनवण्यात येत आहे. नीसारमुळे नैसर्गिक आपतीची माहिती, हिमकडा कोसळणे आणि परिस्थितीमध्ये होणारे बिघाड याचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.
इस्त्रोने 2012 मध्ये स्वदेशी बनावटीच्या रडार इमॅजिंग सॅटलाईट म्हणजे रिसॅट-1 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्यानंतर नासाला इस्त्रोसोबत काम करण्यामध्ये रुची निर्माण झाली. काहींनी रिसॅट-1 ला भारताचा हेरगिरी करणारा उपग्रह ठरवला आहे. दिवस असो वा रात्री कुठल्याही वातावरणात पृथ्वीच्या पुष्ठभागाची छायाचित्रे काढण्यात रिसॅट-1 सक्षम आहे. नीसार उपग्रह विकसित करण्यासंबंधी भारत-अमेरिकेमध्ये दोनवर्ष चर्चा झडली. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2014 सालच्या अमेरिका दौ-यात त्यांनी अमेरिकेचे तात्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याबरोबर या उपग्रह निर्मितीच्या करारावर स्वाक्षरी केली.