US On PM Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 जुलै 2024 रोजी रशियाचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर अमेरिकेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिकी संसदेत कामकाज सुरू असताना सहाय्यक सचिव डोनाल्ड लू यांनी पीएम मोदींच्या रशिया दौऱ्याच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी ज्यावेळी रशियाला गेले होते, त्यावेळी अमेरिकेत नाटो परिषद सुरू होती. त्यामुळेच अमेरिकेला पीएम मोदींच्या दौऱ्यामुळे मिरची झोंबली. स्वस्तात शस्त्रे मिळवण्यासाठी भारत रशियावर अवलंबून आहे. भारत रशियाकडून गॅस खरेदी करतो आणि त्यांना पैसे देतो. हाच पैसा युक्रेनमधील लोकांना मारण्यासाठी वापरला जातो, अशी टीका डोनाल्ड लू यांनी केली होती.
परराष्ट्र मंत्रालयाने दिले उत्तर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानी म्हटले की, "आमचे रशियाशी भारताचे दीर्घकालीन संबंध आहेत, जे परस्पर हितसंबंधांवर आधारित आहेत. तसंही, या जगातील सर्व देशांना कोणाशी संबंध ठेवायचे अन् कोणशी नाही, याचा पूर्ण अधिकार आहे. प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्याचे कौतुकही केले पाहिजे," अशी स्पष्टोक्ती रणधीर जैस्वाल यांनी दिली.