नवी दिल्ली - भारतातील मतदारांनी देशाची सत्ता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती सोपविण्याचा ऐतिहासिक कौल गुरुवारी (23 मे) दिला. मोदींच्या झंझावातात, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना पराभव पत्करावा लागला आहे. भाजपामधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशानंतर जगभरातील नेते मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. तसेच त्यांना शुभेच्छा देत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (24 मे) मोदींना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारतीय भाग्यशाली आहेत, कारण त्यांच्याकडे मोदी आहेत, असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटरवरून मोदींची स्तुती केली आहे. नरेंद्र मोदींना विजयाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नुकतीच फोनवरुन चर्चा झाली. मोठ्या राजकीय विजयाबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. ते भारताचे महान नेते आहेत. भारतीय नागरिक भाग्यवान आहेत, कारण त्यांच्याकडे मोदी आहेत' असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींनीही त्यांना शुभेच्छा देणाऱ्या व्यक्तीचे आभार मानले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी देखील पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. हिंदी भाषेत ट्वीट करून त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 'माझे मित्र नरेंद्र मोदी, निवडणुकीतील प्रभावशाली विजयाबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन. हे लोकसभेचे निकाल देशातील सर्वात मोठी लोकशाहीतील आपलं नेतृत्व सिद्ध करत आहेत. आपण एकत्र येऊन भारत आणि इस्रायलमधील मैत्री आणखी दृढ होण्यासाठी प्रयत्न करत राहू. खूपच छान' असं ट्वीट बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केलं आहे.
नरेंद्र मोदी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या गुजरातला जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या गुजरातला जाणार आहेत. त्यानंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भरुभरुन मते देणाऱ्या वाराणसीच्या जनतेचे आभार मानण्यासाठी परवा काशीला जाणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'आईचे आशीर्वाद घेण्यासाठी उद्या संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. त्यानंतर माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी परवा सकाळी काशीला जाणार आहे.'
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या इनिंग्जची जय्यत तयारी सुरू झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी बहुधा येत्या गुरुवारी 30 मे रोजी होण्याची शक्यता आहे. काल शुक्रवारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत सध्याची 16वी लोकसभा विसर्जित करण्याचा आणि नरेंद्र मोदी यांच्या आभाराचा, असे दोन प्रस्ताव पारित करण्यात आले. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले. त्यानंतर राष्ट्रपतींनी सुद्धा त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत.