वॉशिंग्टन -कोरोनामुळे संपूर्ण जगातच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही कोरोना चाचणी केली होती. या चाचणीत त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. या रिपोर्टनुसार त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांनी शुक्रवारी कोरोना चाचणी केली होती. ट्रम्प यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट 24 तासांपेक्षाही कमी वेळेत आला आहे.
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच आपण कोरोना व्हायरसची चाचणी केलेल्याची माहिती दिली होती. ब्राझीलच्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर कोरोना चाचणी न करण्यावरून ट्रम्प अमेरिकन माध्यमांच्या निशाण्यावर होते.
गेल्या आठवड्यात ट्रम्प फ्लोरिडा येथे ब्राझीलचे राष्ट्रपती जेर बोलसोनारो आणि त्यांचे प्रेस सेक्रेटरी फॅबियो वाजेनगार्टन यांना भेटले होते. ब्राझीलला परतल्यानंतर वाजेनगार्टन यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर बोलसोनारो यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकन सरकारने ५० अब्ज डॉलरचा निधीही मंजूर केला आहे.
कोरोनोची साथ ही जागतिक महामारी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही पावले उचलली आहेत. कोरोनामुळे जगभरात पाच हजारपेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. त्यात अमेरिकेतील जवळपास ५० जणांचा समावेश आहे. अमेरिकेतील ५० पैकी तब्बल ४५ राज्यांत कोरोना पसरला आहे.