अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये फक्त तीन तासांच्या भेटीवर येणार आहेत. त्यांचे जंगी स्वागत व या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी सरकारी तिजोरीतून सुमारे १०० कोटी रुपये खर्च होणार आहेत.डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे. ट्रम्प यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद महानगरपालिका, अहमदाबाद नागरी विकास प्राधिकरण (एयूडीए) या दोन्ही संस्था शहरातील रस्त्यांची डागडुजी तसेच त्या परिसराचे सौंदर्यीकरण करत आहेत. ट्रम्प यांचा प्रवास सुसह्य व्हावा म्हणून एअरपोर्ट रोडवरील दीड किमी परिसरात नवे पेव्हर ब्लॉक बसविणे, त्या मार्गावर पाम झाडांची लागवड करणे तसेच अन्य १७ रस्त्यांची दुरुस्ती अशी कामे सध्या हाती घेण्यात आली आहेत. या कामांवरच ६० कोटी रुपये खर्च होतील. ट्रम्प ज्या मार्गाने शहरात प्रवेश करतील त्या मार्गाचे सौंदर्यीकरण करण्याकरिता मनपाने ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर एयूडीए रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २० कोटी रुपये खर्च करणार आहे.
ट्रम्प लोकप्रिय; मोदी दुसऱ्या क्रमांकावरअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे फेसबुकवर सर्वात लोकप्रिय नेते ठरले असून, या श्रेणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तशी घोषणा फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी नुकतीच केली होती. या सन्मानाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी फेसबुकचे आभार मानले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलानिया या २४ व २५ फेब्रुवारी रोजी भारताच्या दौºयावर येत आहेत.