ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - कट्टरपंथी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे त्रस्त असलेल्या सीरियाने अमेरिकेवर घणाघाती आरोप केला आहे. दहशतवादा विरोधी लढाई म्हणजे अमेरिकेचा धाधांत खोटेपणा आहे, याउलट इसिस आणि अलकायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांना अमेरिकाच रासायनिक शस्त्रास्त्रं पुरवत असल्याचा गंभीर आरोप सीरियाने केला आहे.
जर अमेरिका दहशतवादाविरोधात आहे तर आमच्या सैन्याची मदत करण्याऐवजी ते आमच्याच सैनिकांवर का हल्ले करत आहेत. आमच्या निरागस नागरिकांना रासायनिक हल्ल्याद्वारे का लक्ष्य केलं जातंय, आमचं सैन्य अलकायदा आणि इसिस विरोधात लढत आहे पण दहशतवादा विरोधी लढ्याच्या नावाखाली अमेरिका आमच्या शहरांवर, रहिवासी वस्त्यांवर हल्ले करत आहे, असा आरोप भारतातील सीरियाचे राजदूत डॉ. रियाद कामेल अब्बास यांनी केला आहे.
अमेरिकेच्या कारवाईमुळे इसिसचं नाही तर आमचं नुकसान होत आहे, इसिसचे दहशतवादी रासायनिक हल्ले करत आहेत, त्यांना शस्त्रास्त्रं कोण पुरवत आहे? भारत आमचं दुःख समजू शकतो कारण दोन्ही देश सीमेपलीकडील दहशतवादाने त्रस्त आहेत असं ते म्हणाले. अमेरिकेत राष्ट्रपती बदलतात पण सीरियाबाबत त्यांची नीती बदलत नाही आम्हाला रशिया आणि भारतासारख्या देशांकडून मदतीची अपेक्षा आहे असं अब्बास म्हणाले.