नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसकडून विजयी झालेल्या अभिनेत्री नुसरज जहाँ आणि मिमी चक्रवर्ती पहिल्याच अधिवेशनात चांगल्याच चर्चेत आल्या. त्यातच खासदार नुसरत यांनी लोकसभा अध्यक्षांचा आशीर्वाद घेतल्यामुळे सोशल मीडियावर नुसरतचे कौतुक झाले होते. आता तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक खासदार चर्चेत आल्या असून अमेरिका रिटर्न महुआ मोईत्रा आपल्या संसदेतील पहिल्या भाषणामुळे चर्चेत आल्या आहेत.
पश्चिम बंगालमधील कृष्णानगरमधून खासदार असलेल्या महुआ यांनी आपल्या पहिल्याच भाषणात सरकारला लक्ष्य करताना देशात हुकूशाही सुरू असल्याचे म्हटले. महुआ या अमेरिकेतील बहुराष्ट्रीय जेपी मॉर्गन कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होत्या. त्यांनी भारतात आल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. २००८ मध्ये बँकरची नोकरी सोडून महुआ यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राहुल गांधी यांच्या आम आदमी का सिपाही या मोहिमेत काम केले होते. त्यानंतर यूथ काँग्रेसमध्ये काम केले. परंतु, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची स्थिती पाहता त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१६ मध्ये त्यांनी प्रथमच टीएमसी आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. महुआ या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
लोकसभेत महुआ म्हणाल्या की, आज देशाचं संविधान धोक्यात आहे. तुम्ही हे मान्य करणार नाही. याला तुम्ही अच्छे दिन म्हणू शकता. परंतु, डोळे उघडून पाहिल्यास तुम्हाला धोके लक्षात येतील. यावेळी त्यांनी हुकूमशाहीकडे इशारा करताना मोदी सरकारवर टीका केली. त्यांनी आपल्या भाषणात रामधारी सिंह दिनकर, शायर राहत इंदुरी आणि मौलाना आझाद यांचा उल्लेख केला. भारत नेहमीच सर्व धर्मातील लोकांची भूमी राहिलेला आहे. परंतु, त्याचं स्वरुप बदलत असल्याचे महुआ यांनी म्हटले.
महुआ यांच्या भाषणाचे कौतुक जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केले आहे.