भारताच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य गोळा करणाऱ्या चीनची तंतरली आहे. अचानक उत्तराखंडमध्ये अमेरिकी सैनिकांना पाहून चीनचा तिळपापड झाला आहे. यावर भारताने ताबतोब चीनवर उत्तरही डागले आहे. आमच्या जमिनीवर आम्ही युद्धाभ्यास करत असू तर तिसऱ्या देशाचा यात काय संबंध अशा शब्दांत सुनावले आहे.
उत्तराखंडमध्ये भारत आणि अमेरिकेच्या सैन्यामध्ये युद्धाभ्यास सुरु झाला आहे. यावर चीनने आक्षेप नोंदविला आहे. यावर भारताने लागलीच उत्तर दिले आहे. चीनने आधी आरशात तोंड पहावे, लडाखमध्ये अतिक्रमण करून चीनने कशाप्रकारे सामंजस्य कराराचे उल्लंघन केलेय ते पहावे, अशा शब्दांत भारताने सुनावले आहे.
भारत अमेरिकेच्या युद्धाभ्यासामुळे एलएसीवर शांततेचा भंग होत असल्याचे चीनने म्हटले होते. अमेरिकेची एलएसीवरील उपस्थिती चीनला खटकली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारताने कोणासोबत लष्करी सराव करायचा आणि कोणासोबत नाही हे सांगण्याचा अधिकार कोणत्या तिसऱ्या देशाला दिलेला नाही. या सरावाचा द्विपक्षीय संबंधांशी काहीही संबंध नाही. चीनने तरीही यावर आक्षेप नोंदविल्याने त्यांना सांगणे गरजेचे आहे. चीनने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. स्वतः 1993 आणि 1996 च्या करारांचे उल्लंघन केले आहे.
1993 चा करार LAC वर शांतता राखण्यासाठी आहे. 1996 चा करार 'भारत-चीन सीमा क्षेत्रा'वर दोन्ही बाजूंकडून एकमेकांना विश्वासू वातावरण निर्माण करण्यावर आहे. चीनमधील कडक कोरोना लॉकडाऊनच्या निषेधाबाबत विचारले असता परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. कोरोनाला तोंड देण्यासाठी कोणत्याही देशाच्या रणनीतीवर मी भाष्य करणार नाही. यासोबतच लवकरच जग कोरोनाच्या कहरातून बाहेर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.