नवी दिल्ली : भारतीय लष्करात अमेरिकेचे आरक्यू-११ मानवविरहित हवाई वाहन (यूएव्ही) व इस्रायलचे घातक बॉम्ब लवकरच दाखल होणार आहेत.अमेरिकेकडून रेवेन हे हाताने लाँच करण्यात येणारे व रिमोट कंट्रोलवर चालणारे २०० यूएव्ही भारत खरेदी करणार आहे. हे १० किलोमीटर दूरपर्यंत जाऊ शकतात व ५०० फूट उंचीपर्यंत उडू शकतात. त्यांचा वेग ९५ किलोमीटर प्रतितास असणार आहे. याद्वारे शत्रूच्या जवानांच्या तैनातीची भारताला अचूक माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर इस्रायलकडून स्पाईक लाईटरिंग बॉम्ब खरेदी करणार आहे. याद्वारे ४० किलोमीटरपेक्षा अधिक लांबीपर्यंत अचूक मारा करता येणार आहे. एवढेच नव्हे, तर लक्ष्य याच्या पल्ल्याच्या बाहेर असेल, तर हे बॉम्ब परतही बोलावता येणार आहेत.यापूर्वी इस्रायलकडून स्पाईक मार्क-३ हे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र खरेदी केले होते. आता एक किलोमीटर परिसरात दडलेल्या शत्रूवर अचूक मारा करण्यासाठी हे बॉम्ब वापरले जातील.72,000रायफली भारतीय लष्कर जवानांसाठी अमेरिकेकडून खरेदी करणार आहे. जुन्या आणि कालबाह्य बंदुका आणि रायफली बदलून भारतीय पायदळ अत्याधुनिक करण्याच्या कार्यक्रमांतर्गत आक्रमक प्रहार करणाऱ्या रायफली भारतीय लष्कर खरेदी करीत आहे.लडाखमध्ये चीनसोबत सीमावाद चालू असताना भारतीय लष्कर ‘सिग सॉयर’ या रायफली खरेदी प्रक्रियेला गती देत आहे.पाकिस्तान, चीनकडून वाढत असलेला धोका पाहून भारत आपल्या लष्कराची ताकद वाढवत आहे. त्याचबरोबर भारतीय हवाई दलाला या महिन्यात पॅरिसहून पाच राफेल मल्टी-रोल फायटर जेट मिळणार आहेत. हे अंबालामध्ये तैनात असतील.दुसरी बॅलेस्टिक मिसाईल फायरिंग अण्वस्त्र सज्ज पाणबुडी आयएनएस अरिघात नौदलात या वर्षअखेरपर्यंत समाविष्ट करण्यात येणार आहे.
लष्करात अमेरिकेचे यूएव्ही, इस्रायलचे बॉम्ब लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:01 AM